डोंबिवली – डोंबिवली पूर्व डाॅ. राॅथ रस्त्यावरील सरकत्या जिन्यात पावसाचे पाणी शिरल्याने बुधवारपासून सरकता जिना बंद आहे. मुख्य वर्दळीच्या भागातील सरकता जिना बंद असल्याने रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा सरकता जिना सकाळच्या वेळेत फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांचा सोयीचा होता. तो दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
डोंबिवली पूर्व डाॅ. राॅथ रस्त्यावर कैलास लस्सी दुकानाशेजारी उदवाहन आहे. डाॅ. राॅथ रस्त्याच्या मध्यभागी सरकता जिना आहे. त्यामुळे सुनीलनगर, राजाजी पथ, म्हात्रेनगर, आयरे गाव परिसरातून येणारे नागरिक या सरकत्या जिन्याने थेट रेल्वे स्थानकात जातात. सकाळच्या वेळेत लोकल पकडण्याच्या विचारात असलेले महिला, पुरूष प्रवासी या जिन्याने फलाटावर जाऊन आपल्या नेहमीच्या वेळेतील लोकल पकडतात. दोन दिवसांपासून सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बाजुच्या जिन्याने प्रवाशांना पायी रेल्वे स्थानकात जावे लागते. यामध्ये हदय, दम्याचा त्रास असलेल्या प्रवाशांची सर्वाधिक दमछाक होते.
जिन्याची उंची वाढवा
डाॅ. राॅथ रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबते. मुसळधार पाऊस असला की याठिकाणी तीन ते चार फूट पावसाचे पाणी असते. त्यामुळे या रस्त्यावरील दुकाने, आस्थापना पाण्याखाली जातात. या रस्त्यावर रस्त्याला समांतर सरकता जिना रेल्वेने उभारला आहे. गेल्या दोन वर्षापासून या सरकत्या जिन्यात पावसाचे पाणी जाऊन हा जिना बंद राहत आहे. रेल्वे प्रशासनाने या सरकत्या जिन्याची यंत्रणा उंचवट्यावर घेऊन या जिन्यातील यंत्रणेत पाणी जाणार नाही, अशी व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
अशाच पध्दतीने डाॅ. राॅथ आणि पाटकर रस्त्याच्या मध्यभागी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात असलेल्या रेल्वेच्या उदवाहनमध्ये दरवर्षी पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी शिरते. आणि हे उदवाहन बंद राहते. या सततच्या पाणी घुसण्याच्या प्रक्रियेमुळे सरकता जिना आणि उदवाहनाची यंत्रणा खराब होत आहे. या दोन्ही यंत्रणांना पावसाच्या पाण्याचा होणारा त्रास विचारात घेऊन रेल्वेने या दोन्ही यंत्रणा पावसाच्या तुंबलेल्या पाण्यापासून सुरक्षित राहतील यादष्टीने त्यांची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात शिळफाटा, पलावा, २७ गाव, एमआयडीसी परिसरातून नागरिक प्रवासासाठी येतात. या रेल्वे स्थानकातील ही प्रवाशांची वर्दळ विचारात घेऊन पूर्व भागातील डाॅ. राॅथ रस्ता आणि पाटकर रस्त्यावरील सरकता जिना, उदवाहनाची योग्यरितीने रेल्वेने उभारणी करण्याची प्रवाशांची मागणी आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील पाच ते सहा वर्षापासून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पूर्व भागातील उदवाहन जागा उंचावर नेण्याची आणि या यंत्रणेत पावसाचे पाणी शिरणार नाही, अशी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. पूर्व भागातील सरकता जिना, उदवाहन यांच्या पावसाळ्यातील समस्येविषयी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत हा विषय उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपस्थित करण्यात येऊन, याविषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येईल, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.
