डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला यापुढे दिसला तर पालिकेच्या ग आणि फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील एकूण ४० कामगार एका झटक्यात निलंबित करून टाकीन आणि तुमच्या जागी नवीन कामगार नियुक्त करीन. त्यामुळे फेरीवाल्यांना हटविण्याची दिलेली कामे प्रामाणिकपणे पार पाडा. मला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका, अशी तंबी दोन दिवसापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक डोंबिवली रेल्वे स्थानक भागात दौरा करून अधिकारी, कामगारांना दिली होती. त्यानंतर निलंबनचा धसका घेतलेल्या कामगारांनी आता झोकुन काम करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे डोंबिवली पूर्व डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी गल्लीत फेरीवाल्यांचा शुकशुकाट आहे.
मागील दोन दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, भाजी मंडई, कामत मेडिकल पदपथ भागात ठाण मांडून बसलेले फेरीवाले अचानक गायब झाल्याने खरेदीदार नागरिक आश्चर्यचकित आहेत. फक्त एक नेहमीचा फेरीवाला विक्रेता छत्र्या घेऊन पालिकेच्या स्कायवाॅकखाली पाटकर रस्त्यावर बसत असल्याचे दृश्य आहे. कर्मचारी या विक्रेत्याला तेथून हटवत आहेत.
आयुक्तांचा दौरा
मागील तीन महिन्यांपासून अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी मनावर घेऊन फ आणि ग प्रभाग साहाय्यक आयुक्तांच्या साहाय्याने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात महत्वाची भूमिका बजावली. डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद आणि त्यांना सामान खरेदीसाठी काही राजकीय मंडळी पैसे देत होती. आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयातील वीज देयके, कार्यालय भाडे या फेरीवाल्यांच्या हप्त्यामधून भरण्यात येत होती. डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांवर यापूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली की तात्काळ संबंधित राजकीय मंडळी आक्रमक होत पालिका अधिकारी, फेरीवाले हटाव कामगारांना दमदाटी करून कारवाईपासून परावृत्त करत होते. पण, राजकीय दबावाला न जुमानता उपायुक्त बोरकर यांनी अतिशय सयंतपणे डोंबिवली पूर्वेतील फेरीवाला हटविण्याची प्रक्रिया येणाऱ्या सर्व परिस्थितीवर मात करत मागील तीन महिन्यात पार पडली. त्यामुळे पूर्व भागातील बहुतांशी फेरीवाले गायब झाले आहेत.
ग प्रभागात ठाण
पालिकेच्या ग प्रभागातील डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडीतील फेरीवाले हटण्यास तयार नसल्याने नगरसेवक आयुक्तांकडे, महासभेत हे प्रश्न उपस्थित करून आयुक्तांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधत होते. ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील दोन कामगारांच्या या कुचकामी कारवाईमुळे बदल्या करण्यात आल्या. तरीही डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी फेरीवाल्यांनी गजबजून जात असल्याने ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी दोन दिवसापूर्वी आयुक्त गोयल रात्री साडे आठ वाजता अचानक कोणाही अधिकाऱ्याला पूर्व कल्पना न देता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात खासगी वाहनाने आले. त्यांनी नेहरू रस्ता, कामत मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट घर, पाटकर रस्ता भागात भर पावसात पाऊण तास पायपीट केली.
कामगारांना तंबी
यावेळी किरकोळ पध्दतीने फेरीवाले रस्त्यांवर बसल्याचे आयुक्तांना दिसले. आयुक्तांनी भर रस्त्यात फेरीवाला हटाव पथकातील ४० कामगारांना दोन रांगेत उभे केले. नागरिकांसमक्ष यापुढे एकही फेरीवाला रेल्वे स्थानक भागात दिसला तर तुम्हाला तडकाफडकी निलंबित केल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी दिली. आयुक्त संतप्त झालेले पाहून कामगार बिथरले. त्यानंतर आता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कामगार रांगेत फेरीवाला कुठे बसणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. या प्रकाराने नागरिक मात्र समाधान व्यक्त करत आहेत.
