डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभाग हद्दीत दररोज सकाळी गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेऊन काही विक्रेते खाद्य पदार्थांची विक्री करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर ठेऊन खाद्य पदार्थांची विक्री करणे प्रतिबंधित असताना पालिका बाजार परवाना, ग प्रभाग फेरीवाला हटाव पथक आणि पोलिसांना न जुमानता या खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षभरात अशाप्रकारे रस्त्यावर गॅस सिलिंडर ठेऊन खाद्य पदार्थ तयार करणे आणि त्यांची विक्री करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील सुमारे ३०० हून अधिक हातगाडी चालकांवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी फौजदारी कारवाया केल्या आहेत. अशाप्रकारच्या कारवाया पोलिसांकडून सुरू आहेत. तसेच पालिकेच्या फ आणि ग प्रभागाकडून या फेरीवाल्यांच्या हातगाड्या थेट जप्त करून पालिकेच्या भंगार तळावर नेल्या आहेत. अनेक हातगाड्यांची जागीच जेसीबीच्या साहाय्याने तोडमोड करण्यात आली आहे. तरीही असे हातगाडी चालक पुन्हा सक्रिया झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या तीन महिन्यापासून डोंबिवली पूर्व ग आणि फ प्रभागात फेरीवाल्यांवर पालिकेकडून आक्रमक कारवाई सुरू आहे. त्यामुळे ग आणि फ प्रभागातील फेरीवाले बहुतांशी प्रमाणात गायब झाले आहेत. ग प्रभागात मात्र उर्सेकरवाडीतील फेरीवाले हटण्यास तयार नसल्याने पालिका अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांची बदली झाल्यानंतर आणि ग प्रभागात बदली कामगार फेरीवाला हटाव पथकात दाखल झाले आहेत. या कामगारांविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. हे कामगार फेरीवाल्यांना पाठबळ देऊन त्यांना रस्त्यावर बसण्यास भाग पाडत असल्याची चर्चा आहे. आम्ही रेल्वे स्थानकाच्या कोपऱ्यावर उभे राहतो. आम्ही रेल्वे स्थानक भागातून बाजुला झालो की मग तुम्ही बिनधास्त व्यवसाय करा, असे ग प्रभागातील कामगार फेरीवाल्यांना सांगत असल्याच्या तक्रारी आहेत.
यामुळेच खाद्य पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक सकाळीच रेल्वे स्थानक भागात दाखल होत असल्याच्या तक्रारी आहेत.गेल्या तीन महिन्यात भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथ भागात एकही
फेरीवाला बसणार नाही, असे नियोजन केले होते. पण पवार यांची बदली झाल्यानंतर हे फेरीवाले पुन्हा रस्ते, पदपथावर बसण्यास सक्रिय झाले आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग प्रभागात पालिकेने कमांडो सकाळ नऊ ते रात्री १० या वेळेत चक्राकार पध्दतीने नेमले तर फेरीवाल्यांचा कायमचा बिमोड करणे शक्य होईल, असे काही जाणकार नागरिक सांगतात. ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांची कारवाईविषयक भूमिका संशयास्पद असल्याने पालिकेने या भागात कमांडो नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ग प्रभागात नव्याने दाखल झालेले साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे या फेरीवाल्यांना हटविण्यात किती रस दाखवतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ग प्रभागातील फेरीवाले रस्त्यावर बसल्याच्या प्रतिमा, दृश्यध्वनी चित्रफिती नागरिकांकडून थेट पालिकेच्या वरिष्ठांना पाठविल्या जात आहेत. एका वरिष्ठाने मात्र फेरीवाल्यांना हटविण्यात हयगय केली तर त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल. आपण कोणा वरिष्ठाच्या मर्जीतले आहोत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, अशी सक्त ताकीद या अधिकाऱ्याने दिली.
