डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत मागील दोन वर्षापासून थंडावलेली बेकायदा चाळी, गाळ्यांची बांधकामे जोरात सुरू आहेत. यापूर्वी तोडलेल्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या बेकायदा इमारतींच्या कामांना पुन्हा वेग येत आहे. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा असल्याने पादचाऱ्यांना तसेच वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर गणपती मंदिराच्या बाजुला पालिका ह प्रभाग अधिकाऱ्यांना न जुमानता दोन दिवसांत बेकायदा गाळ्यांची उभारणी केली आहे.

पालिका ह प्रभागातील सफाई कामगार, अतिक्रमण नियंत्रण पथकाचे कामगार, फेरीवाला हटाव पथक ह प्रभाग हद्दीत फिरत असतात. त्यांना मुख्य वर्दळीच्या सुभाष रस्त्यावर गणपती मंदिराच्या बाजुला उभारण्यात येत असलेले बेकायदा गाळे दिसत नाहीत का, असे प्रश्न नागरिक करत आहेत. रस्ता रूंदीकरणाला बाधा येईल अशा पद्धतीने या गाळ्यांची उभारणी केली जात आहे. अनेक वर्ष मोकळ्या असलेल्या जागेवर बेकायदा गाळे उभारणीमुळे रहिवाशांचा जाण्यायेण्याचा रस्ता बंद झाला आहे. या परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या दोन बेकायदा गाळ्यांच्या विरूध्द पालिकेत तक्रारी केल्याचे स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन बेकायदा गाळे बांधून जागा अडवायची आणि त्यानंतर पुन्हा त्यावर आणखी मजला चढवून ते गाळे भाड्याने द्यायचे. या गाळ्यांना नंतर पालिकेचा मालमत्ता कर लावून ते अनधिकृत गाळे अधिकृत करून घ्यायचे अशी भूमाफियांची अनेक वर्षाची पध्दत आहे. या सर्व प्रक्रियेत पालिका मालमत्ता कर विभागाचे प्रभागातील कर्मचारीही सामील असल्याचे यापूर्वीच्या तक्रारी आणि चौकशीतून पुढे आले आहे.

रस्ता रूंदीकरणात अडसर

सुभाष रस्ता, वीर जिजामाता रस्त्याचे येणाऱ्या काळात पालिकेला रूंदीकरण करायचे असेल तर पालिकेला या बेकायदा गाळ्यांचा अडसर येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी सुभाष रस्त्यावर गणपती मंदिराच्या बाजुला उभारण्यात येत असलेल्या बेकायदा गाळ्यांची पाहणी करून ते अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

सुभाष रस्ता भागात सुरू असलेल्या बेकायदा गाळ्यांची पाहणी करून त्या बांधकामाची सत्यता पडताळून ते गाळे तात्काळ जमीनदोस्त केले जातील. – विजय भोईर साहाय्यक आयु्क्त, ह प्रभाग, डोंबिवली.