डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सुनिल नगर परिसरातील आशापुरा मंदिर, जानकी व्हिला ते कडोंमपा वाहनतळ इमारत ते गांधीनगर नाला आणि गांधीनगर नाला ते नांदिवली नाला समांतर रस्त्याचे वाढत्या नागरीकरणाचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेने सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी सुनिल नगर भागातील माजी नगरसेवक भगवान बामा पाटील यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
सुनिल नगर भागात जुन्या नागरी वस्तीबरोबर नवीन वस्तीत वाढ होत आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. हा नागरी विकास होत असताना अस्तित्वामधील जुने रस्ते मात्र अद्याप पाच मीटर ते १० मीटर रूंदीचे आहेत.
वाढत्या वस्तीला, वाढत्या वाहनांना हे रस्ते अपुरे पडत आहेत. दत्तनगर चौक ते ध. ना. चौधरी विद्यालय परिसरात मोठा जाहीर कार्यक्रम असला की हे रस्ते वाहन कोंडीने गजबजून जातात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी या भागातून चालणे, आपली वाहने नेणे अवघड होते. सुनीलनगर प्रभागातून पालिकेला कोट्यवधी रूपयांचा मालमत्ता कर मिळतो. त्यामुळे या भागातील अस्तित्वातील, नवीन विकास आराखड्यातील रस्ते मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक भगवान पाटील यांनी केली आहे.
… तर रस्त्याचा वापर
रस्ता काँक्रिटीकरण सुनीलनगर भागातील आशापुरा मंदिर, अंबर पॅलेस, जानकी व्हिला, कल्याण डोंबिवली पालिकेचे बांधिव रिकामे वाहनतळ ते पालिका नागरी आरोग्य केंद्र ते गांधीनगर नाला दरम्यानचा रस्ता गांधीनगर नाल्याला समांतर आहे.
– हा रस्ता सुस्थितीत नसल्याने नागरिकांना या रस्त्याचा वापर करणे अवघड होते. गांधीनगर नाल्यापर्यंत हा रस्ता काँक्रिटीकरणाचा करून तो पुढे नांदिवली नाल्याला जोडला तर परिसरातील नागरिक, वाहन चालक या रस्त्याचा नियमित वापर करतील. – ज्यावेळी ध. ना. चौधरी विद्यालय परिसरात काही जाहीर कार्यक्रम, सण, उत्सवातील कार्यक्रम असतील त्यावेळी नागरिक या गांधीनगर नाला ते नांदिवली नाला समांतर रस्त्याचा वापर करू शकतात. या मुख्य वाहतुकीला पर्यायी मार्ग असलेल्या रस्त्याकडे पालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
– पालिका हद्दीत अनेक काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. पालिकेने या महत्वाच्या रस्ताचा काँक्रिटीकरणासाठी विचार करून नागरिकांना द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे.
‘वाहनतळ पूर्णक्षमतेने सुरू करा’
सुनिल नगर भागात पालिकेचे भव्य बांधिव वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी लाखो रूपयांचा महसूल मिळू शकतो. हे वाहनतळ पालिकेने चालविण्यास दिले तर परिसरातील नागरिकांना आपली वाहने उभी करण्याची सोय उपलब्ध होऊ शकते. सुनिल नगर प्रभागासह परिसरातील रस्त्यावर उभी असलेली वाहने मालक या वाहनतळात कायमस्वरूपी आणून उभी करू शकतात. अशा दूरदृष्टीने विचार करून पालिकेने हे वाहनतळ पूर्णक्षमतेने सुरू होईल यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक भगवान पाटील यांनी आयुक्त गोयल यांच्याकडे केली आहे.
