डोंबिवली – चित्रकला, विज्ञान, भित्तीचित्रे अशी विविध प्रकारची प्रदर्शने भरतात. मग क्रीडाविषयक माहिती देणारी क्रीडा प्रदर्शने पण झाली पाहिजेत असा विचार करून डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या अरूणोदय शाखेने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या आवारात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात शाळेतील ८० विद्यार्थ्यांनी एकूण क्रीडाविषयक विविध प्रकारचे माहिती देणारे ३६ प्रकल्प सादर केले. या क्रीडा प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ टेबल टेनिसपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या श्रृती कानडे-जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सविता मगर, शाळा समिती अध्यक्षा डाॅ. सरोज कुलकर्णी, क्रीडा शिक्षक रवींद्र पवार, संजय जोशी, अरूण एतवडे उपस्थित होते.

प्रकल्प सादरीकरण

विद्यार्थ्यांची क्रमिक अभ्यास करताना क्रीडाविषयक कौशल्ये विकसित झाली पाहिजेत म्हणून मुख्याध्यापिका सविता मगर, क्रीडा शिक्षक रवींद्र पवार, संजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्यातून कबड्डी, खोखो, क्रिकेट, टेबल टेनिस, गोळाफेक, भालाफेक, उंच, लांब उड्डी, जाळीत टाकण्याचा चेंडू अशा विविध खेळांची माहिती प्रदर्शनातून मांडण्याचे आवाहन केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी या खेळांची समग्र माहिती आटोपशीर जागेत सादर करायची होती. मागील दहा दिवस ८० विद्यार्थी या प्रदर्शनासाठी काम करत होते.

शाळेने प्रदर्शनाचे सर्व साहित्य पुरवले. काही विद्यार्थी शाळेच्या मोकळ्या जागेत आपल्या संकल्पनेतून प्रदर्शनातील आपला प्रकल्प सरस व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. हे प्रकल्प करताना काही विद्यार्थ्यानी कृत्रिम प्रज्ञेचे साहाय्य घेतले. एका विद्यार्थ्याने तर २४ तास रात्रंदिवस काम करून प्रकल्पाची उभारणी केली. विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक कौशल्ये विकसित व्हावीत या विचारातून या क्रीडा प्रदर्शनाचे आयोजन केले, असे प्रास्ताविकात रवींद्र पवार यांनी सांगितले.

खेळाबद्दल उदासीनता

बालमन, बालवय खेळ, मौजमजेचे असते. आता या बालवयात मुलांना बालवाटिकांमध्ये प्रवेश घेऊन पालक मुलांना जखडून ठेवत आहेत. मुलांना बालवयापासून मोकळे वातावरण मिळाले नाहीतर कसा होईल त्यांचा मानसिक विकास. अभ्यासाबरोबर मुलांची अंग, शारीरिक हालचालीची कौशल्ये बालवयापासून विकसित झाली पाहिजेत. तरच ती क्रीडा कौशल्यात पुढे जातील. पण आता खेळ या प्रकाराविषयी खूप उदासीनता दिसून येत आहे, अशी खंत प्रमुख पाहुण्या श्रृती कानडे यांनी व्यक्त केली.

यश आणि खेळ स्वस्त नाहीत. यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात. जिद्द, मेहनत, कष्ट उराशी बाळगून सराव करावे लागतात. तरच यश मिळते, असा सल्ला कानडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.हे पहिलेच क्रीडा प्रदर्शन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता झालेल्या चुका दुरूस्त करून पुढील प्रकल्प अधिक दर्जेदार, माहितीपूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत. या चुका, त्रृटी आपणास यशाचे धडे देत असतात, असे अध्यक्षा सरोज कुलकर्णी यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थी

या क्रीडा प्रदर्शनातील काही विद्यार्थ्यांचे प्रकल्प आकर्षक ठरले. अशा विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून क्रीडाशिक्षक अहिर, म्हात्रे यांनी केले. इयत्ता आठवी -प्रथम क्रमांक आदित्य वेताळ, द्वितीय मधुरा अहिरे, तृतीय क्रमांक स्वरा पाटील, इयत्ता नवववी – प्रथम-भाग्यश्री दळवी, द्वितीय- स्वराज येलवे, तृतीय डच वायंगणकर, इयत्ता दहावी-प्रथम- श्रावण धुमाळ, द्वितीय-धीरज पाटील, तृतीय-तनया उतेकर.