डोंबिवली : डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद शाळा अरूणोदय शाखेसह शहरातील इतर शाळांमधील क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या २१ विद्यार्थ्यांची इंडोनेशियात पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या क्रीडापटु विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील राज्यस्तरिय, हरयाणा रोहतक येथील राष्ट्रीय येथील स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
तेरावी स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा हरयाणा राज्यातील रोहतक येथे पार पडली. या स्पर्धेत समर्थ क्रीडा प्रबोधिनीच्या ॲथलेटिक्समधील विविध गटातील धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक अशा प्रकारांमध्ये १८ पदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवले. समर्थ क्रीडा प्रबोधिनीच्या संचालिका धनश्री पवार, प्रशिक्षक रविन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण पूर्ण केले. हरयाणा येथील स्पर्धेसाठी विद्यार्थी मागील महिनाभर सराव करत होते, असे संचालिका धनश्री पवार यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरिय स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेथे त्यांना यश मिळाले. हरयाणा येथील राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाल्याने या विद्यार्थ्यांची इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय जोशी,कार्यवाह-शिरीष फडके, क्रीडा समिती प्रमुख – प्रकाश म्हात्रे आणि कार्यकारिणीने कौतुक केले आहे.
इंडोनेशियातील स्पर्धेसाठी निवड
साईवा थोरात-लांब उडी, विहान तांबे, धावणे, लांब उडी, दक्ष शहा-लांब उडी, शाश्वत थोरात -धावणे, लांब उडी, निखिल घाडीगावकर, धावणे, अदिती गरड-धावणे, नाविन्या भगत -लांब उडी, वेदश्री आवारे-धावणे, रेवा सरफदार-लांब उडी, विधी सोडाई-गोळाफेक, स्वराज येळवे-थाळीफेक, सार्थक घाग-थाळीफेक, पुर्वेश आडारकर-धावणे, चैतन्य मालुसरे-गोळाफेक, त्याचप्रमाणे विघ्नेश तुपे, लोकेश भोईर, वेदांत गुरव, हर्षित आडारकर, अमेय शिर्के, आयुष शिंदे, श्रीया शिर्के या खेळाडुंची इंडोनेशियातील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आवाहन
इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दोन भावांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या मुलांची आई मोलमजुरी करून आपल्या मुलांचा सांभाळ करते. क्रीडाविषयक गुणवत्ता असलेल्या या दोन मुलांची इंडोनेशियातील स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्या आर्थिक खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डोंबिवली शहर परिसरातील दात्यांनी या दोन मुलांच्या इंडोनेशियातील स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन प्रशिक्षकांनी केले आहे.
