डोंबिवली – डोंबिवलीतील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युट संस्थेच्या ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी तक्ष्वी तुषार पठाडे हिने सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुहेरी पदक पटकावले. भोपाळ येथे झालेल्या या स्पर्धेत तिने १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक, तर ५० मीटर बटर फ्लाय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावण्याची कामगिरी केली. या देदीप्यमान यशाने डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे. तिची ही उज्ज्वल कामगिरी अभिमानास्पद आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे, असे प्रशिक्षकांनी सांगितले.
तक्ष्वी या स्पर्धेतील यशासाठी मागील अनेक महिने आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. शालेय अभ्यास करत असताना तिने आपल्या जलतरण प्रशिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. शालेय अभ्यासतही तिची चमकदार कामगिरी असते, असे शिक्षकांनी सांगितले. जलतरणाच्या विविध स्पर्धांमध्ये तिने आतापर्यंत बाजी मारली आहे. कुटुंबीयांची, शाळेतून शिक्षक आणि प्रशिक्षकांची मिळणारी उत्तम साथ यामुळे आपण हे सहज शक्य करत आहोत, असे तक्ष्वी पठाडे हिने सांगितले.
भोपाळ येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातून स्पर्धक विद्यार्थी दाखल झाले होते. तक्ष्वी पठाडे हिने जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्याने जनरल एज्युकेशन संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, ब्लाॅसम शाळेच्या मुख्याध्यापिका नीलजा पाटील, उपमुख्याध्यापिका तृप्ती तोमर यांनी तक्ष्वी पठाडे हिच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून तिला पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. डोंबिवलीतून अशाप्रकारचा हा सन्मान मिळविणारी या वर्षीची तक्ष्वी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे
