डोंबिवली – घरात मुलाचा वाढदिवस असल्याने एका शिक्षकाच्या घरात आनंदाचे वातावरण होते. वाढदिवसाची मेजवानी म्हणून बाहेर हाॅटेलमध्ये जाण्याचा बेत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी केला होता. मंगळवारी रात्री आठ वाजता कुटुंबीय डोंबिवलीतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील लिजन्ड हाॅटेलमध्ये भोजनासाठी गेले. या कालावधीत चोरट्यांनी नेम साधत या कुटुंबियांच्या घराच्या खिडकीच्या लोखंडी जाळ्या काढुन घरात प्रवेश करून घराच्या कपाटातील आठ लाख ९७ हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रमेश घारे (३७) असे तक्रारदार शिक्षकाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्त्यावरील चंद्रकांत पाटकर शाळेजवळील रामनगर भागात एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहतात.
शिक्षक योगेश घारे यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी आपल्या मुलाचा वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाचा आनंद म्हणून कुटुंबीयांनी मेजवानीचा भाग म्हणून डोंबिवलीतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील लिजन्ड हाॅटेलमध्ये रात्रीच्या भोजनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान आम्ही संर्पूण कुटुंबीय मुलाच्या वाढदिवसाची मेजवानी करण्यासाठी घराचा दरवाजा, खिडक्या बंद करून लिजन्ड हाॅटेलमध्ये आलो. रात्री दहा वाजपर्यंत आम्ही भोजन घेतल्यानंतर घरी आलो. घराच्या दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी आम्हाला आमच्या घराच्या शयनगृहातील खिडकीची लोखंडी जाळी टोकदार वस्तूने काढुन ती बाजुला फेकून दिलेली दिसली. हा प्रकार पाहुन आम्हाला धक्का बसला.
चोरट्यानेच हा प्रकार केला असण्याचा संशय व्यक्त करून आम्ही घरातील इतर भागाची पाहणी केली. तेथे काही झाले नव्हते. आम्ही घरातील कपाटांची पाहणी केली. त्यावेळी घरातील चार कपाट्यांच्या खणात कुलुुपबंद करून ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण आठ लाख ९७ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले. घराबाहेर पडल्यानंतरच्या दोन तासाच्या अवधीत हा चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे पाळत ठेऊन चोरट्यांनी ही चोरी केली असण्याचा पोलिसांना संशय आहे.
या चोरीप्रकरणी शिक्षक योगेश घारे यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कोरडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सोळंके यांनी तातडीने घारे यांच्या घरी भेट देऊन चोरी प्रकरणाची पाहणी केली. घारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
