डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ कैलास लस्सी आणि रेल्वे उदवाहन भागात मध्य रेल्वेचे वाहनतळ आहे. या वाहनतळावर सुमारे दीडशेहून अधिक दुचाकी वाहने दररोज शुल्क आकारून उभी केली जातात. वाहनतळाच्या आतील भाग वाहनांनी भरून गेला की आतील भागात जागा नसल्याने ४० हून अधिक दुचाकी वाहने दररोज वाहनतळाच्या बाहेरील डाॅ. राॅथ रस्त्यावर वाहने पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली जात आहेत. दररोजच्या या त्रासामळे प्रवासी, रिक्षा चालक, दुचाकी स्वार त्रस्त आहेत.

असाच प्रकार ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळावर सुरू आहे. या वाहनतळावरील आतील जागा दुचाकी वाहनांनी भरून गेली की वाहनतळ चालक उरलेली वाहने ठाकुर्ली पूर्व रेल्वे फाटकाजवळील रखडलेल्या उड्डाण पुलाखालील गाळ्यांमध्ये वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी करून ठेवली जातात. यामुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यान ठाकुर्ली चोळेमार्गे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना ठाकुर्ली रेल्वे फाटक भागातील रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांचा त्रास होतो.

डाॅ. राॅथ रस्ता कोंडीत

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पाटकर रस्ता आणि डाॅ. राॅथ रस्ता जोड भागात कैलास लस्सी जवळील रेल्वेच्या जागेत एक खासगी ठेकेदार रेल्वेच्या परवानगीने दुचाकीचे वाहनतळ चालवितो. या वाहनतळाची वाहने उभी करून ठेवण्याची क्षमता सुारे दीडशे ते दोनशे आहे. आतील भागातील वाहने उभी करून ठेवण्याची क्षमता संपली की दुचाकी स्वार वाहनतळ चालकाच्या अनुमतीने वाहनतळाबाहेरील डाॅ. राॅथ रस्त्यावर वाहने उभी करून कामावरून निघून जातात.

वाहनतळावर वाहने उभी करणारा बहुतांशी वर्ग हा नोकरदार आहे. सकाळी वाहनतळाबाहेर वाहने उभी करून तो लोकल पकडण्यासाठी गडबडीत निघून जातो. ही वाहने आतमध्ये घेण्याची जबाबदारी वाहनतळ चालकाची आहे. परंतु, वाहनतळ चालक दिवसभर ही वाहने आत जागा नसल्याने रस्त्यावर उभी करून ठेवतात. आणि त्याचा त्रास या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी, रिक्षा चालक आणि इतर वाहन चालकांना होतो. मागील काही दिवसांपासून हा प्रकार डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सुरू आहे.

ठाकुर्लीतही बेकायदा वापर

ठाकुर्ली रेल्वे फाटकाच्या बाहेर एक दुचाकीचे वाहनतळ आहे. या वाहनतळावरील आतील भागातील दुचाकी उभी करण्याची क्षमता संपली की वाहनतळ चालक या वाहनतळाबाहेरील रखडलेल्या उड्डाण पुलाखालील गाळ्यांमध्ये नियमबाह्यपणे दुचाकी वाहने उभी करून पालिकेच्या जागेचा वापर करत आहे. या रखडलेल्या पुलाखालील २० ते २५ गाळे पालिकेने दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यासाठीी भाड्याने चालविण्यास दिले तर पालिकेला महसुली उत्पन्न मिळेल.

मागील पाच वर्षापासून एकाही पालिका अधिकाऱ्याने याविषयी प्रयत्न केले नाहीत. सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यासाठी प्रयत्नशील होत्या, पण त्यांच्या प्रस्तावाला वरिष्ठांकडून मंजुरी मिळाली नाही. आता फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर या गाळ्यांमध्ये पे ॲन्ड पार्क सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वाहनतळ सोडून बाहेर वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून नियमित कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे वाहने उभी राहू नयेत यासाठी संबंधित वाहनतळ चालकाला समज देण्यात येत आहे.- श्रीराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली.