डोंबिवली – दणदणाट मुक्त गणेशोत्सव साजरा करा, असे पुणे, ठाणे आणि राज्याच्या विविध भागात सामाजिक वातावरण निर्माण होत असताना, मागील ७७ वर्षापासून सार्वजनिक रस्त्याची वाट न अडवता, दणदणात न करता, पारंपारिक पध्दतीने डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव उत्साहाने शांततेत साजरा केला जातो. पर्यावरणस्नेही, पारंपारिक पध्दती आणि सामाजिक उपक्रम, सामाजिक भान ठेऊन उत्सव साजरा करण्यावर टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा सर्वाधिक भर असतो.
गणेशोत्सव म्हणजे डीजे, डाॅल्बीचा दणदणाट, ध्वनीप्रदूषण असे वातावरण काही उत्सवी मंडळी निर्माण करत आहेत. परंतु यामुळे पर्यावरणीय, सामाजिक वातावरण सर्वाधिक प्रदुषित होत आहे. ही उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा नसल्याने पुण्यात विद्यानंद बापट, ठाण्यात डाॅ. महेश बेडेकर यांनी दणदणाटी उत्सवा विरूध्द आवाज उठवला आहे. एकीकडे राज्याच्या विविध भागात दणदणाटी गणेशोत्सवा विरूध्द नागरिक रस्त्यावर उतरले असताना, डोंबिवलीत टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव मागील ७७ वर्षापासून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या पारंपारिक पध्दत, संस्कृती रक्षण, सामाजिक भान, पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा केला जात आहे.
मैदानातून सुरूवात १९५० मध्ये टिळकनगर भागातील खंडकर, पारखी, सोनटक्के, जपे, प्रभू, पंडित, वीरकर आणि इतर समविचारी मंडळींनी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य असे विविध उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येऊ लागले. सुरूवातीच्या काळात या मंडळींनी टिळकनगरमधील एका मोकळ्या मैदानात शहराचा गणपती म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. गणपती उत्सव हा सार्वजनिक व्यवस्थेला अडथळा होईल अशा पध्दतीने साजरा करायचा नाही, अशी टिळकनगर गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्याचे पालन मागील ७५ वर्षापासून मंडळ सदस्य करत आहेत.
काही वर्ष के.एन.कुलकर्णी सभागृहात हा उत्सव केला जात होता. मागील तीस वर्षापासून टिळकनगरचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयातील प्रशस्त सभागृहात साजरा केला जातो. अन्य उंच गणपती मूर्तीशी स्पर्धा न करता लहान आकाराची दीड फूट उंचीची शाडुची गणपती मूर्तीची टिळकनगर गणेशोत्सव मंडळात प्राणप्रतिष्ठा केली जाते. कला संस्कृतीची सजावट गणेशोत्सवतील सजावटीत विविध संस्कृतींचे दर्शन घडविले जाते. ज्येष्ठ कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या पुढाकारातून दाक्षिणात्य, चिनी, रोमन, नेपाळ, हिमाचलप्रदेश, कम्बोडिया, पॅरिस महल अशा विविध देशोदेशींच्या संस्कृतींचे दर्शन मंडळाने मागील २५ वर्षात केले आहे. गणेशोत्सव काळात आणि वर्षभर विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक मंडळातर्फे राबविले जातात. गणेशोत्सव काळात जमा होणारा निधी आदिवासी, दुर्गम डोंगराळ भागातील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त अशा विविध ठिकाणी दिला जातो. हम संस्थेच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यातील शैक्षणिक सुविधांसाठी मंडळाने निधी दिला आहे.
बाहेरून काही विकत आणायेच नाही. मंडळाच्या सदस्य शक्तीमधून सर्व सुविधा निर्माण करायच्या हा मंडळाचा शिरस्ता आहे. पारंपारिक मिरवणूक मंडळातील तरूण दररोज गणेशोत्सव काळात रात्रीच्या वेळेत भजन करतात. सहकार्याच्या भावनेतून एकत्र आलेल्या महिलांनी तयार केलेले दडपे पोहे, काकडी आणि पेढा असा प्रसाद भाविकांना दिला जातो. बिदागी देऊन कोणालीही मंडळात ढोल, ताशा, लेझिम खेळण्यासाठी आमंत्रित केले जात नाही. मंडळाचे सदस्य ढोल ताशा वादन, भजन गात पालखीमधून गणपतीची विसर्जन मिरवणूक काढतात. कोणत्याही प्रकारचा दणदणाट न करता, गुलाल न उधळता वाहतुकीला अडसर येईल अशी कृती न करता ताई पिंगेळ चौकातील पालिकेच्या कृत्रिम तलावात गणपती मूर्तीचे विधीवत विसर्जन केले जाते. यावर्षीही अशाच पारंपारिक पध्दतीने मंडळाचे पदाधिकारी सचिन आंबेकर, संजय शेंबेकर, केदार पाध्ये, संदीप वैद्य, हिमांशू जोशी, नंदन दातार यांच्या नेतृत्वाखाली टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे.
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाप्रमाणे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणपती उत्सव आपल्या पारंपारिक प्रथा, परंपरा जपत, पर्यावरणस्नेही, सामाजिक भान ठेऊन साजरा केला जातो. मंंडळाचे कार्यकर्ते एक दिलाने पूर्वजांनी सुरू केली ही परंपरा पुढे नेत आहेत. – संदीप वैद्य विश्वस्त,टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. डोंबिवली.
मागिल काही वर्षांपासून तरुण कार्यकर्त्यांकडे गणेशोत्सवाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर्षी अथर्व दशपुत्र हे उत्सव समिती प्रमुख आहेत तर कार्यकारी मंडळातून प्रसाद रिसबूड यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहै
