डोंबिवली : डोंबिवली पूर्व लोकमान्य टिळक रस्त्यावरील पालिकेच्या जुन्या सुतिकागृहाच्या जागेवर पालिकेकडून कर्करोग रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यांमुळे आजुबाजुच्या दोन इमारती खचल्या आहेत. तसेच बाजुचा गोमांतक गल्लीतील रस्ताही खचला आहे. त्यामुळे नागरिक, प्रवासी, वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून डोंबिवली वाहतूक विभागाने टिळक रस्त्यावरील ताई पिंगळे चौक (सर्वेश सभागृह) ते बापूसाहेब फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकातील वाहतूक बंद करून ती पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक रस्त्याला असलेले छेद रस्ते गोमांतक गल्ली, छत्रपती शिवाजी गल्ली रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे तिन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहन चालक, प्रवाशांनी बापूसाहेब फडके रस्ता, आगरकर रस्ता, मानपाडा रस्ता, गणेश मंदिर रस्ता, स्वा. सावरकर रस्ता, शहीद भगतसिंग रस्ता या पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जावे असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे.
लोकमान्य टिळक रस्त्यावर ब्राह्मण सभेसमोरील जुन्या पालिकेच्या सुतिकागृहाच्या ठिकाणी कर्करोग रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी नागरी वस्तीत ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्याच्या लगत अलीकडेच उभारण्यात आलेल्या दोन नवीन इमारती आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून या खड्ड्याच्या आतील भागातील माती खचू लागली. त्यानंतर या खड्ड्याच्या बाजुला असलेल्या मैत्री रुक्मिणी सदन इमारतीची संरक्षक भिंत गुरुवारी मध्यरात्री कोसळली.
बाजुच्या सायं विसावा इमारतीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले. गेल्या आठवड्यात याच भागात गोमांतक गल्लीतील रस्त्याला तडा गेला होता. त्यानंतर महावितरणचे रोहित्र कोसळले होते. या घटनांकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे खड्ड्यालगतच्या इमारतींना धोका पोहचण्याची शक्यता असल्याने या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांचे अन्य अन्य ठिकाणी शनिवारी सकाळी तातडीने पुनर्वसन करण्यात आले.
शनिवारी संध्याकाळी एका इमारतीच्या आधार खांबा लगतचा भाग खचू लागला होता. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी वाहतूक विभागाने या कर्करोग रुग्णालय भागातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खड्ड्याच्या ठिकाणी सुस्थितीमधील काम होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे.
