डोंबिवली : १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत साकारलेल्या ३५ हजार चौरस फुटांच्या भव्य तिरंगा झेंड्यासह विश्वविक्रमी तिरंगा रॅलीच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या डोंबिवलीतील १०० सामाजिक संस्था व ७१ शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी डोंबिवली येथे कृतज्ञता सोहळा पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहभागी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित मान्यवरांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक तिरंगा रॅलीत मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हातात घेऊन नागरिकांनी केलेले मार्गक्रमण व रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे डोंबिवलीत राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व सोहळा साकारला. या उपक्रमाची वर्ल्ड रेकाॅर्ड इंडिया, अशिया बुक रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये विश्वविक्रमी नोंद झाली. विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांपर्यंत विविध घटकांनी एकत्र येत या रॅलीला मोठे बळ दिले. या सर्वांच्या योगदानाची दखल घेत कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीच्या रस्त्यांवर एक विशाल तिरंगा घेऊन हजारो नागरिक एकत्र आलेला क्षण हा अत्यंत अभिमानाचा होता. मुसळधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी दाखवलेला उत्साह अविस्मरणीय होता. या विश्वविक्रमी रॅलीचा विक्रम हा केवळ एका उपक्रमाचा विक्रम नसून डोंबिवलीकरांच्या राष्ट्रप्रेमाचा, सामाजिक एकतेचा व सामूहिक सहभागाचा गौरव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हजारो विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभाग घेतला, ही विशेष समाधानाची बाब आहे. नव्या पिढीने देशाच्या प्रगतीसाठी पुढे यावे आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. १०० सामाजिक संस्था आणि ७१ शाळांनी एकत्र येत दिलेले योगदान हे डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण आहे. विविध क्षेत्रांतील संस्था, विद्यार्थी आणि नागरिक एका तिरंग्याखाली एकत्र येऊ शकतात, याची ताकद या रॅलीच्या माध्यमातून दिसून आली. या सर्वांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा सोहळा आयोजित करण्यात आला असून, सहभागी प्रत्येक संस्था, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागाबद्दल खासदार डाॅ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी माधव जोशी, प्रवीण दुधे, संजय पाटील, पुंडलिक पै अनेक मान्यवर उपस्थित होते.