Dombivli to Thane Bus Service: कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली पश्चिमेतील स्वामी नारायण सिटी गृहसंकुल ते माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे माजिवडा ऋतू बिझनेस पार्क बससेवा बुधवारपासून (ता. ४) सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकलची वाढती गर्दी, प्रवाशांचे होणारे हाल आणि वाढते रेल्वे अपघात याचा विचार करून डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना बस मार्गानेही ठाणे परिसरात जाता यावे या उद्देशाने कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) हा निर्णय घेतला आहे.

कल्याण, डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून प्रवासी पडून मृत्यू पावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना रेल्वेला पर्याय म्हणून बसचीही सुविधा उपलब्ध असावी म्हणून भाजपचे डोंबिवली मोठागावचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन व्यवस्थापक, ठाणे पालिका परिवहन व्यवस्थापकांकडे डोंबिवली मोठागाव भागातील स्वामी नारायण सिटी माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे माजिवडा, घोडबंदर बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

ही बससेवा नियमित वेळेवर उपलब्ध झाली तर अनेक नोकरदार, प्रवासी, ज्येष्ठ लोकलला लोंबकळत जाण्यापेक्षा बसने आरामात डोंबिवलीत ते ठाणे बसने प्रवास करू शकतील. या माध्यमातून परिवहन उपक्रमांचा महसूल वाढण्यास साहाय्य होईल, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली, ठाणे पालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणले होते.

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने या मागणीची गंभीर दखल घेत बुधवारपासून (ता. ४ मार्च) पासून डोंबिवली ते ठाणे या ८२ क्रमांकाच्या मार्गिकेवर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केडीएमटीचे साहाय्यक वाहतूक अधीक्षक दीपक चौधरी यांनी नगरसेवक म्हात्रे यांना पत्र पाठवून आपल्या मागणीप्रमाणे बससेवा सुरू करत असल्याचे कळविले आहे.

ठाणे पालिका परिवहन उपक्रमाचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी टीएमसीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्या की या बसमार्गाचा विचार करण्याचे कळविले आहे. ही बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

एक तासाचा प्रवास

डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीचा या बस वाहतुकीला फटका बसू नये, मोठागाव रेल्वे फाटकात बस अडकून पडू नये म्हणून स्वामी नारायण गृहसंकुल येथून या बस सोडण्यात येणार आहेत. प्रवासी रिक्षेने रेल्वे स्थानक परिसरातून माणकोली पुलापर्यंत येतील तेथून बसने ठाण्यापर्यंतचा प्रवास करतील. एक तासाचा हा प्रवास आहे. डोंबिवलीतील सकाळी पहिली बस सव्वा सात वाजता सुटेल. शेवटची बस पावणे सात वाजता ठाणे (माजिवडा जंक्शन) येथे सुटेल. माजिवडा येथून पहिली बस सकाळी सव्वा आठ वाजता स्वामी नारायण सिटीसाठी सुटेल. शेवटची बस पावणे नऊ वाजता सुटेल. या बसचे किमान भाडे पाच आणि कमाल भाडे २० रूपये आहे. हा प्रवास १४ किलोमीटरचा आहे. सुरुवातील दोन बस प्रवासी वाहतुकीत असणार आहेत.

बस थांबे

डोंबिवली ते ठाणे दरम्यान स्वामी नारायण सिटी, सुरई नाका, लोढा अप्पर ठाणे, खुशी एक्सीस वर्ल्ड, लोढा धाम, इंडियन ऑईल पंप, माणकोली, अंजूरदिवे, आर. सी. पाटील बंगला, बाॅम्बे ढाबा, खारीगाव टोलनाका, खारेगाव फाटा, लोढा काॅम्पलेक्स, रुस्तोमजी, माजिवडा ऋतू बिझनेस पार्क.