डोंबिवली – डोंबिवली शहरात पुरेशी वाहनतळे नाहीत. त्यामुळे वाहन चालक डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील वर्दळीचे रस्ते, गल्लीबोळात आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून नोकरी, व्यवसायाला निघून जातात. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या या वाहनांमुळे डोंबिवली शहर विचित्र वाहन कोंडीत अडकत चालले आहे. ही रस्तोरस्तीची वाहने उचलण्यासाठी यापूर्वीची असलेली टोईंग वाहन सुविधा बंद करण्यात आली आहे. आपल्या वाहनांवर कारवाई होणार नाही याची खात्री असल्याने वाहन चालक मनमानीने वाहने उभी करून ठेवतात. डोंबिवली शहर दिवसेंदिवस रस्ते दुतर्फाच्या वाहनांमुळे कोंडीत अडकत चालले आहे. या कोंडीवर प्रभावी उपाय योजण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
डोंबिवली शहर परिसरातून दररोज हजारो लोक नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, नाशिक, कर्जत, डहाणू, पनवेल परिसरात जातात. यामधील अनेक नोकरदार आपली वाहने डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील पंडित दिनदयाळ रस्ता, सुभाषचंद्र रस्ता, महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, देवी चौक रस्ता, महात्मा गांधी रस्ता, भागशाळा मैदान परिसर, पूर्व भागातील मानपाडा रस्ता, आगरकर रस्ता, नेहरू रस्ता, फडके रस्ता, टिळक रस्ता, सावरकर रस्ता, टाटा लाईन मानव सेवा कल्याण केंद्र, कस्तुरी प्लाझा टाटा लाईन गल्ली भागात उभ्या करून ठेवतात.
मनमानीने वाहनतळ
मुख्य वर्दळीचे रस्ते सकाळपासून दुचाकी, चारचाकी वाहनांनी गजबजून जातात. कामावर जाण्याची घाई असल्याने वाहन मालक वाहन उभे करून कामाच्या ठिकाणी निघून जातो. दिवसभर ते वाहन रस्त्याच्या कडेला उभे असते. अशाप्रकारच्या हजारो दुचाकी, चारचाकी वाहने डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील रस्त्यांवर उभ्या केलेल्या असतात. वाहतूक विभागाने आखून दिलेल्या नियमांचे या वाहन चालकांनी उल्लंघन केलेले असते. दुचाकी, चारचाकी वाहने उभी केलेले रस्ते शहरातील सर्वाधिक प्रवासी, वाहन वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांचा मोठा अडथळा येतो. येणारी जाणारी वाहने या दुतर्फाच्या वाहनांमुळे अडकून पडतात. त्यामधून वाहन कोंडी होते. रिक्षा, खासगी बस, केडीएमटीच्या बस डोंबिवलीतील प्रवासी वाहतुकीसाठीचे मुख्य साधन आहे. ही वाहने या रस्त्याच्यावरच्या वाहनांमुळे अडकून पडतात. शाळेच्या बस, प्रवाशांना या कोंडीचा दररोज त्रास सहन करावा लागतो, असे धात्रक यांनी म्हटले आहे.
वाहतूक विभागाकडून यापूर्वी शहरात टोईंग वाहन फिरवले जात होते. या वाहनाच्या भीतीने वाहन चालक आपल्या दुचाकी वाहनतळावर वाहतूक विभागाने आखून दिलेल्या सम, विषम तारखेच्या रस्त्यांवर उभ्या करत होते. आता टोईंग वाहनाचा धाक राहिलेला नाही. ही सेवा किमान डोंबिवली शहरासाठी सुरू करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी उपायुक्तांकडे केली आहे.
वाहतूक पोलिसांकडे या वाहनांविषयी तक्रार केली की ते येऊन त्या वाहनांवर जागेवर ई चलन पध्दतीने दंड वसूल करतात.ते वाहन दिवसभर त्याच ठिकाणी उभे असल्याने त्याचा वाहतुकीला त्रास होतो. डोंबिवली शहरातील रस्ते दुतर्फाच्या वाहनांच्यामुळे होणाऱ्या कोंडीविषयी प्रभावी उपाय करण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात. किमान डोंबिवली शहरासाठी टोईंग वाहन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. यापूर्वी ही वाहने शहरात नियमित सेवा देत होती. त्यावेळी कारवाईच्या भीतीने वाहन चालक आपली वाहने शिस्तीने वाहनतळावर उभी करत होती, असे धात्रक यांनी वाहतूक विभागाच्या निदर्शनास आणले आहे.
