डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, बापूसाहेब फडके रस्ता, पाटकर रस्ता, डाॅ. राॅथ रस्ता भागात खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक रस्त्यावर दुचाकी उभ्या करून पादचारी, वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. अशा बेशिस्तीने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी चालकांच्या मालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाने दोन दिवसापूर्वी ई चलान पध्दतीने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागात नियमबाह्य पध्दतीने वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांना दणका बसला आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर बाजारपेठेचा भाग आहे. या भागात रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वर्दळ असते. तसेच, बाजीप्रभू चौकात बस थांबा, रिक्षा वाहनतळ आहे. चिमणी गल्ल्यांमध्ये भाजीपाला बाजार भरतो. या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ठेवतात. आणि बाजारात खरेदीसाठी जातात. काही नागरिक रेल्वे स्थानकातून येणाऱ्या प्रवाशाला घेण्यासाठी आपल्या दुचाकी रेल्वे स्थानक भागात आणून उभ्या करतात. आणि आजुबाजुला फिरत राहतात.
या दुचाकींमुळे या भागातून जाणारे पादचारी, रिक्षा चालक, इतर दुचाकी स्वार यांना अडथळा येतो. पावसाळ्यात अशा पध्दतीने दुचाकी उभ्या करून ठेवल्या तर नागरिकांना या भागातून पायी चालणे मुश्किल होईल. त्यामुळे या दुचाकी स्वारांच्या बेशिस्त वर्तनाविषयी वाहतूक विभागाकडे तक्रारी वाढल्या होत्या.
डोंबिवली वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पादचाऱ्यांना रस्ते, पदपथ मोकळे पाहिजेत म्हणून रेल्वे स्थानक भागात नियमबाह्य पध्दतीने, वाहनतळ सोडून, समविषय तारखेच्या नियमांचे उल्लंघन करून उभ्या केलेल्या दुचाकींवर कारवाई करण्याचे आदेश आपल्या सहकारी हवालदारांना दिले. चार ते पाच हवालदार ई चलान यंत्र घेऊन डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात दाखल झाले. पोलिसांनी ही वाहने कोणाची याची पर्वा न करता रस्ते अडवून उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी मालकांना ई चलान पध्दतीने दंड लावला.
अचानकच्या या कारवाईमुळे दुकानात खरेदीसाठी गेलेल्या दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. अनेक दुचाकी स्वार दुकानातील खरेदी अर्धवट सोडून वाहतूक हवालदाराला आर्जव करण्यासाठी धावत पळत बाहेर आले. पण वाहतूक हवालदार महिलेने त्यांच्या आर्जवाची पर्वा न करता ई चलान पध्दतीने दंड ठोठावला. पुन्हा अशा पध्दतीने नियमबाह्य पध्दतीने वाहनतळ सोडून वाहने उभी केली तर मोटार वाहन कायद्याने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
वाहतूक पोलिसांनी दररोज अशाप्रकारची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, अंतर्गत भागातील रस्त्यांवर नियमबाह्य पध्दतीने एकही वाहन रस्ते, पदपथ अडवून उभे राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. शहरात नियमित वाहतूक विभागाची गस्त असते. वाहतुकीला अडथळा उभ्या करून ठेवणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर नियमित दंडात्मक कारवाई केली जाते. – श्रीराम पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग.
