डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागातील १२ रहिवाशांचा एक गट दोन दिवसापूर्वी तीर्थयात्रेच्या निमित्ताने सोलापूर, कोल्हापूर भागात मोटारीने (क्लोजर मोटार) गेला होता. या भागातील विविध तीर्थस्थळांना भेटी देऊन हा गट सोमवारी संंध्याकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान मोटारीने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा भागातून पंंढरपूर येथे महामार्गाने जात होता. यावेळी भरधाव वेगातील एका मालवाहू ट्रकने भाविकांच्या मोटारीला समोरून जोराने धडक दिली. या भीषण अपघातात मोटारीतील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. एका गंभीर जखमी लहान मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात या अपघातामधील जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेने डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगरमधील विकासक सोमनाथ भोईर मालक असलेल्या शेवंता हाईट्स या इमारतीत हे रहिवासी राहत होते. काही दिवा येथील होते. केकाणे आणि गुप्ता कुटुंबातील सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला.
सुट्ट्यांमुळे फिरायला
मागील तीन दिवस सलग सुट्ट्या असल्याने उमेशनगरमधील या १२ रहिवाशांनी सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर भागात महालक्ष्मी देवी, स्वामी समर्थ, तुळजाभवनी देवी. तेथून पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन मग परतीचा प्रवास करण्याचे निश्चित केले होते. सोलापूर भागात दर्शन घेऊन ते पंढरपूरला महामार्गाने जात होते. मंगळवेढा देगाव शिवाराजवळून जात असताना एक अवजड मालवाहून ट्रकने भाविकांच्या मोटीराला समोरून जोराने धडक दिली.
अपघात घडला
या धडकेत वाहन काही अंतर प्रवाशांसह दूरवर फेकले गेले. ट्रकच्या धडकेमुळे वाहनाचा समोरील भागाचा चुराडा झाला. धडक बसल्यानंतर काही प्रवासी रस्त्यावर बाहेर फेकले गेले. काही जण आतमध्ये चेंबले गेले. ट्रकची मोटारीला धडक बसताच मोठा आवाज झाला. अपघात होताच स्थानिक रहिवासी, मंगळवेढा पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले. वडाप वाहनात काही प्रवासी होते. या वाहनाचाही चुराडा झाला. यामधील काही प्रवासी जखमी झाले.
मृत, जखमी व्यक्ती
या भीषण अपघातात सोनम आहिरे, सविता गुप्ता, योगिनी केकाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कविता तुडसकर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनावणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, आदित्य गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव, नवनाथ हिडकिट्टी (चालक) अशी जखमींची नावे आहेत. यामधील काही भाविकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे साहाय्य
डोंबिवलीतील भाविकांच्या वाहनाला सोलापूर येथे अपघात झाल्याचे समजताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रात्रीच सोलापूर येथील आमदार पोटे, पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांना संपर्क करून या अपघातामधील जखमींवर योग्य ते उपचार आणि आवश्यक ते साहाय्य करण्याच्या सूचना केल्या. बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, मनोज जोशी यांनी डोंबिवलीतून सोलापूर येथे जाण्यासाठी जखमींच्या नातेवाईकांसाठी वाहने उपलब्ध करून दिली.
