डोंबिवली : रक्षा बंधनानिमित्त डोंबिवली उंबार्ली येथील उपक्रमशील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम सादर केला. या अनोख्या रक्षाबंधनातून शाळेने वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते.
विद्यानिकेतन शाळेच्या प्रशस्त आवारात विविध प्रकारची नवीन, जुनाट झाडे आहेत. या झाडांचे शाळेतर्फे संगोपन केले जाते. वाढते उष्णतामान विचारात घेता आता वृक्ष लागवडीची खूप गरज आहे. त्यामुळे नवीन रोपांच्या लागवडी बरोबर आता जुन्या झाडांचेही समर्पित भावाने संगोपन केले पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने नवीन रोपांची लागवड, त्याचे संगोपन, जुनाट झाडांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी माहिती शाळेतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आली.
त्यानंतर शाळेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला राखी देण्यात आली. झाडांना विद्यार्थ्यांकडून आरती ओवळण्यात आली. झाडांना कुंकू लावण्यात येत होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील गुलमोहर, आंबा आणि इतर सर्व झाडांना राखी बांधली. दोन तास हा झाडांना रक्षा बांधण्याचा कार्यक्रम शाळेच्या आवारात सुरू होता. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यानिकेतन शाळेच्या आवारातील झाडांचे बुंधे राख्या बांधल्याने रंगीबेरंगी दिसत होते.
कल्याणमध्ये सद्भावना संदेश
कल्याणमधील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व रक्षाबंधन सोहळा’
साजरा करण्यात आला. गफूर शेठ डोन उर्दू शाळेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उर्दू शाळेच्या शिक्षिका डिबा दफेदार
यांनी ईद-ए-मिलादचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. सम्राट अशोक विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी काळे यांनी रक्षाबंधनचे महत्त्व व त्यामागील भावनिक नाते याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली. उर्दू शाळेचा विद्यार्थी सूर्य फातियाने पठण केले.
दोन्ही शाळांतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’ दिला. विद्यार्थ्यांनीही मुलींना भेटवस्तू देत या बंधुभावाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
दोन्ही शाळांतील महिला व पुरुष शिक्षकांनीही एकमेकांना राख्या बांदत कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रुबीना शेख, सम्राट अशोक विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्यासह
दोन्ही शाळांतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले, भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. जाती-धर्माचे राजकारण करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या रूढी-परंपरा आणि सणांचा आदर करत आपण सर्व भारतीय एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनाचा सोहळा एकत्र साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव आणि सद्भावनेच्या भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश धनविजय यांनी केले, तर आभार फिरदोस मणियार यांनी मानले.
