डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा जगदंबा माता मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये गटाराचे पाणी शिरून ते पाणी नळाद्वारे घरात येत आहे. याविषयी पालिकेत तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे दुषित पाणी पिऊन विविध प्रकारचे आजार होण्याची भीती या भागातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक रहिवाशांना पोटदुखीच्या समस्या उदभवल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

देवीचापाडा भागातील जगदंबा माता मंदिर परिसर हा कल्याण डोंबिवली पालिकेच्या चौपाटी आरक्षणाचा भूखंड आहे. या चौपाटीवर गेल्या २० वर्षात तीन ते चार हजार बेकायदा चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत. या भागातून भरत भोईर नाला वाहतो.

गरीबाचा पाडा, देवीचा पाडा परिसरातून वाहून येणारे गटारे, पावसाचे पाणी या भागातील नैसर्गिक प्रवाहातून खाडीला जाऊन मिळत होते. बेकायदा चाळींमुळे या भागातील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. काही ठिकाणची गटारे बुजविण्यात आली आहेत. त्यामुळे खाडी किनारी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी तुंबून ते या चाळींमध्ये घुसते.

चरीत नळ जोडण्या

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसात जगदंबा माता भागातील अनेक चाळींमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. या तुंबलेल्या पाण्याला वाट काढण्यासाठी पालिकेने या भागात चाळींच्या बाजुला जेसीबीने चऱ्या खोदून ठेवल्या आहेत. या चऱ्यांमधून आता पाऊस आणि गटाराचे पाणी वाहते. या चऱ्यांच्या भागातून नागरिकांच्या घरात गेलेल्या नळ जो़डण्या आहेत. या नळ जोडण्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे या तुटलेल्या भागातून गटारातील पाणी थेट नळ जोडण्यांमध्ये जाऊन ते थेट घरात जाते.

याविषयी स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रहिवाशांनी याप्रकरणी वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नगरचे रहिवासी भाजपचे युवा विभागाचे उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे यांच्याकडे तक्रारी केल्या.

उपाध्यक्ष म्हात्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून खोदलेल्या चऱ्या, त्यामधून वाहत असलेले गटाराचे पाणी आणि त्यामधून गेलेल्या नळ वाहिका यांचे चित्रण करून ते संबंधित पालिका अधिकाऱ्यांना पाठवून दिल्या. याविषयी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

स्थानिक पालिका अधिकाऱ्यांनी हा विषय मार्गी लावला नाहीतर आपण थेट आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याकडे याप्रकाराची तक्रार करणार आहोत, असे उपाध्यक्ष म्हात्रे यांनी सांगितले. पावसाळा सुरू आहे.

जलजन्य आजार पसरू नयेत म्हणून पालिका प्रशासन विविध प्रकारचे जनजागृती कार्यक्रम घेत आहे. हे आजार टाळण्यासाठी आवाहन करत आहे. मग, गटारातून गेलेल्या नळ जोडण्या आणि त्यामधून उदभवणारे आजार याची काळजी प्रशासनाला नाही का, असे प्रश्न म्हात्रे यांनी केले आहेत. या विषयाची दखल घेऊन तातडीने त्या गटाराचा मार्ग बदलण्याची, नळ जोडण्या स्वतंत्र कार्यवाही करण्यात येत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.