डोंबिवली : मुसळधार पावसानंतर डोंबिवली शहराच्या विविध भागांत मुबलक, पुरेसा नियमित पाणीपुरवठा होत असताना डोंबिवली पूर्वेतील पालिका प्रभाग क्रमांक २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळक नगर, अंबिका नगर, तसेच प्रभाग क्रमांक १९ मधील सागर्ली, एमआयडीसी, इंदिरानगर व खंबाळपाडा परिसराला मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या पाणीटंचाईने मुळे नागरिक त्रस्त आहेत. या तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ आणि पुरेशा पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली विभागातर्फे बुधवारी ९० फुटी रस्ता भागातील बालाजी आंगणमधील पालिकेच्या परिमंडळ दोन कार्यालयावर पाणीबाणी मोर्चा मोर्चा काढण्यात आला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक शशिकांत कांबळे, महेश पाटील, शिक्षण मंडळ सभापती अभिजीत थरवळ, प्रभाग प्रभारी ॲड. मनोज घरत, नगरसेविका डाॅ. सविता पाटील, सायली विचारे या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून पाथर्ली, गोग्रासवाडी, अंबिका नगर, खंबाळपाडा, इंदिरा नगर परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.
पुरेसा पाऊस पडूनही व बारवी धरण काठोकाठ भरले असताना पाणी टंचाईचा प्रश्न आपल्या प्रभागात निर्माण झाल्याने स्थानिक नगरसेवकांनी पालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. या पाणीटंचाई संदर्भात पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांना पत्रे देऊनही हा विषय मार्गी लागत नाही. त्यामुळे पाणीटंचाईची झळ बसत असलेल्या प्रभागातील नगरसेवकांनी बुधवारी पालिकेच्या परिमंडळ कार्यालयावर मोर्चा काढून पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी ‘फ’ प्रभाग साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मादलेकर यांच्याकडे केली. हा पाणी प्रश्न लवकर सोडविला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले. गेल्या पंधरा वर्षांमध्ये या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची समस्या कधीही जाणवली नव्हती. गेल्या महिन्याभरापासून या भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक यांना बसत आहे, असे नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
खासगी टँकर सुसाट
एकीकडे खासगी टँकरद्वारे मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत असताना, दुसरीकडे पालिकेचा नियमित पाणीपुरवठा मात्र सुरळीत होत नसल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या टँकर लाॅबीच्या चौकशीची मागणी नगरसेवकांनी केली. आगामी सणासुदीच्या काळातही पाणीपुरवठ्याची स्थिती अशीच राहिली, तर भाजप उग्र आंदोलन करील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश पाटील, शिक्षण मंडळ सभापती अभिजीत थरवळ, नगरसेविका मंदाताई पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, पूजा पाटील ,नगरसेवक साई शेलार, विनोद काळण, ॲड.मंदार टावरे, भाजपा प्रभाग प्रभारी ॲड. मनोज घरत, संजय राणे, संजय विचारे, मिहीर दवते, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा पदाधिकारी सहभागी झाले होते.
