डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात तीव्र पाणी टंचाई आहे. या पाणी टंचाईच्या झळा आता नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या नळावर पाणी भरताना झालेल्या वादातून डोंबिवली पश्चिमेत कोपर जवळील रेल्वे मार्गालगत राहत असलेल्या एका तरूणाने आपल्या शेजारील रहिवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून त्याला जागीच ठार मारले. याप्रकरणातील आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
उमेश रामा वाघे (३४) असे खून झालेल्या रहिवाशाचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील अण्णानगर झोपडपट्टीत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. मनीषा उमेश वाघे यांनी या खूनप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून याप्रकरणातील आरोपी अक्षय जाधव (२८) याला अटक केली आहे.
कोपर रेल्वे स्थानकाजवळील अण्णानगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या सुविधेसाठी पालिकेने सार्वजनिक ठिकाणी नळांची व्यवस्था उभी करून दिली आहे. या झोपडपट्टीतील रहिवासी सकाळ, संध्याकाळ नळाला पाणी येते तेव्हा पाणी भरतात. परिसरातील रहिवाशांनी नळावर पाणी भरताना झुंबड नको म्हणून प्रत्येक घराने क्रमांक लावून सार्वजनिक नळावर पाणी भरावे असा नियम या भागात स्वताहून करून घेतला आहे.
या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाघे कुटुंब आणि जाधव कुटुंब यांच्या मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. नळाला पाणी आले की या दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक वाद होत होते. त्याचे पर्यावसान मग मारामारीत होत होते. अण्णानगर झोपडपट्टीत जाधव आणि वाघे कुटुंबात मंगळवारी रात्री सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या जुन्या विषयावरून वाद सुरू झाला.
दोन्ही कुटुंबात जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी संतप्त झालेल्या अक्षय जाधव याने घरातील लोखंडी सळई आणून ती रागाच्या भरात घराच्या बाहेर उभ्या असलेल्या उमेश रामा वाघे (३४) यांच्या डोक्यात जोराने मारली. सळईचा फटका जोराने बसल्याने उमेश वाघे तात्काळ घटनास्थळीच कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी उमेश वाघे यांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात नेले. पण तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.
ही माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती घेऊन तात्काळ या प्रकरणातील आरोपी अक्षय जाधवला ताब्यात घेतले. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
