डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील स्टेट बँकेसमोरील वखारी जवळ असलेला भूमिगत रस्त्यालगत भूमिगत जलवाहिनीवर पालिकेचा पाणीपुरवठा करणारा व्हाॅल्व्ह (झडप) आहे. या व्हाॅल्व्हच्या माध्यमातून पालिकेचा कर्मचारी सकाळ, दुपार, संध्याकाळ टिळक रस्ता, फडके रस्ता भागातील सोसायट्यांना पाणी पुरवतो.मंगळवारी रात्री एका मोटार चालकाने थेट व्हाॅल्व्हवर स्वत:ची मोटार उभी केली. त्यामुळे कर्मचाऱ्याला पाणी सोडण्यात बुधवारी सकाळी अडचण आली.
ही मोटार वाहतूक विभागाच्या प्रयत्नाने बुधवारी सकाळी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाजूला करण्यात आली. त्यानंतर फडके रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रहिवाशांना पाणी मिळाले.डोंबिवली पूर्वेत सावरकर रस्ता भागात जुन्या रामचंद्र सिनेमागृहाजवळ पालिकेचे उंचावर जलकुंभ आहेत. त्यातून डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, टिळक नगर, फडके रस्ता परिसराला पाणी पुरवठा केला जातो. या जलकुंभांसमोरील रस्त्यावर फडके रस्ता, टिळक रस्ता भागातील सोसायट्यांत पाणी सोडण्याचे व्हाॅल्व्ह आहेत.
व्हाॅल्व्हवर मोटारपालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियंत्रण करणारा व्हाॅल्व्ह स्टेट बँकेसमोरील भागात आहे. या जलकुंभाच्या बाहेरील रस्त्यावर परिसरातील सोसाट्यांमधील रहिवासी आपली वाहने दुतर्फा उभी करून ठेवतात. व्हाॅल्व्ह पाणीपुरवठ्यासाठी नियमित पालिका कर्मचाऱ्यांना उघडावा लागतो याची माहिती असलेले परिसरातील मोटार कार चालक त्याबाबत काळजी घेतात. मात्र बुधवारी रात्रीच्या वेळेत परिसरातील एकाने आपली मोटार या व्हाॅल्व्हवर आणून उभी केली. या मालकाच्या हा व्हाॅल्व्ह लक्षात आला नसावा, अशी चर्चा आहे.पाणीपुरवठा बंदबुधवारी सकाळी १० वाजता पालिकेचा पाणी सोडणारा कर्मचारी दत्तात्रेय खडतारे व्हाॅल्व्हच्या ठिकाणी आला.
त्यांना व्हाॅल्व्हवरच मोटार मालकाने आपले वाहन उभे केले असल्याचे दिसले. या व्हाॅल्व्हवरून फडके रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वस्तीला पाणी सोडले जाते. व्हाॅल्व्हवरील या मोटारीमुळे व्हाॅल्व्ह चालू करणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. मोटार कोणाच्या मालकीची आहे हे समजणे शक्य नव्हते. त्यांना तात्काळ संपर्क करून बोलावणे शक्य नव्हते. कर्मचाऱ्याने सावरकर रस्ता भागातील जागरूक नागरिक श्रीकांत खुपेरकर यांना ही माहिती दिली. खुपेरकर यांनी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांना संपर्क करून घडला प्रकार सांगितला.वाहतूक पोलीस घटनास्थळी
वाहतूक हवालदार कार्ले तात्काळ घटनास्थळी आल्या. त्यांनी मोटार वाहन क्रमांकावरून मोटर मालकाचा मोबाईल क्रमांक वाहतूक उपयोजनवरून मिळवला. हवालदार कार्ले मोटार मालकाला तात्काळ मोटारीच्या ठिकाणी येण्यासाठी संपर्क करत होत्या. मोटार मालक संपर्काला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पाणी पुरवठा सोडणारा कर्मचारी अस्वस्थ होता. वेळेत पाणी आले नाही म्हणून नागरिकांनी पालिकेत संपर्क करणे सुरू केले होते. सकाळी १० ते ११.५० पर्यंत मोटार मालक घटनास्थळी आला नाही. अखेर हवालदार कार्ले यांनी मोटार मालकाला दीड हजार रूपयांचा ई चलन माध्यमातून दंड केला. बराच उशिराने मोटार मालकाने संपर्काला प्रतिसाद दिला. मालक मोटारीजवळ येऊन त्यांनी आपले वाहन बाजुला घेतले. त्यानंतर सकाळी ११.५० वाजता व्हाॅल्व्हमनला परिसराला पाणी सोडता आले.
