कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेकडून डोंबिवली शहराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. ३) बंद ठेवण्याचा निर्णय पालिका पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या सोळा तासाच्या कालावधीत डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा पाणी साठा घरात करून ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांच्या मध्यभागी असलेल्या नेतिवली टेकडीवर डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र आहे. या केंद्रात उल्हास खाडी किनारच्या उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. कल्याण डोंबिवली शहरांची दररोजची पाण्याची गरज सुमारे ३६५ दशलक्ष लीटर आहे. पाणी टंचाई असलेल्या भागात दररोज सुमारे १५ टँकरद्वारे पालिका पाणी पुरवठा करते.

नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रातून अकराशे मिमी व्यासाच्या मु्ख्य जलवाहिनीतून पाणी खंबाळपाडामार्गे पाथर्ली भागातील जुन्या रामचंद्र सिनेमागृह येथील जलकुंभांमध्ये आणले जाते तेथून हे पाणी डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात पालिका वितरित करते. सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीन पाळ्यांमध्ये शहरांच्या विविध भागात हे पाणी वितरित केले जाते. पाणी टंचाईची परिस्थिती असली तरी डोंबिवली शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी नियमित मिळाला पाहिजे हा विचार करून १५ वर्षापूर्वी पालिका पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, उपअभियंता प्रमोद उपाध्ये, कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी प्रभागवार पाणी वाटप (झोनिंग सिस्टिम) पध्दती डोंबिवलीत स्थापित केली आहे. त्याच पध्दतीने आतापर्यंत डोंबिवली शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे डोंबिवलीत यापूर्वीसारखी तीव्र पाणी टंचाई, पाणी पळवापळवी हा प्रकार होत नाही.

खंबाळपाडा परिवहन आगाराजवळ दुरुस्तीचे काम

नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून डोंबिवली शहराला पाणी पुरवठा होतो. या केंद्रातून डोंबिवलीकडे येणाऱ्या पाणीपुरवठा जलवाहिनीला खंबाळपाडा परिवहन आगाराजवळ गळती लागली आहे. ही गळती बंद करणे आवश्यक असल्याने पालिकेने मंगळवारी सकाळी ८ ते रात्री १२ या कालावधीत पाणी बंदचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी दिली.

गळती रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

डोंबिवली, कल्याण शहरातील अनेक जलवाहिन्या नगरपालिका काळातील आहेत. या जलवाहिन्या भूमिगत आहेत. या जलवाहिन्यांमधून पाणी गळती होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. पालिका हद्दीत सुमारे २८ टक्के पाणी गळती आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिका पाणी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. जुन्या फळीतील बहुतांशी अभियंते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे भूमिगत पाणी जलवाहिनीत अडथळे निर्माण झाले की या वाहिन्यांची माहिती नसलेल्या अभियंत्यांची आताच्या नवख्या अभियंत्यांची त्रेधातिरपिट उडत आहे.