डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत यापूर्वी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर रस्तोरस्तीचे पाणी उपशासाठी एकूण पाच पंप होते. आता फक्त एकच पंप पाणी उपशासाठी उपलब्ध आहे. या पंपाची नगरसेवक, पाणी तुंबलेल्या परिसरातील नागरिकांनी मागणी केली की पालिका अधिकारी, कर्मचारी तुम्ही पंप घेऊन जा. त्याला दोन्ही बाजुने पाईप तुम्हीच लावा आणि डिझेल कमी असेल तर ते तुम्ही भरून घ्या, अशा सूचना देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
बेकायदा बांधकामांमुळे डोंबिवली पश्चिमेचा खाडी किनारा भाग, सखल भाग मागील तीन ते चार दिवसांपासून जलमय होत आहे. घरात शिरलेले पावसाचे पाणी बादली, घरातील भांड्यांनी उपसून नागरिक थकले आहेत. अशा परिस्थितीत नागरिक समुहाने पालिकेच्या ह प्रभागात येऊन पाणी उपसा करणाऱ्या पालिकेच्या पंपाची मागणी करतात. यावेळी अधिकाऱ्यांकडून आता फक्त एकच पंप उपलब्ध आहे. तो तुम्ही घेऊन जा, असा सल्ला देतात. या पंपाजवळ नागरिक आले की त्या पंपाच्या दोन्ही बाजुला पाईप दिसत नाहीत.
या पंपाला नेण्यासाठी ट्राॅली किंवा टेम्पो आणि इतर आवश्यक सामग्रीची आवश्यकता असते. पण असे कोणतेही साहित्य पंपाला नाही. उपसा पंप असला की त्याच्या सोबतच पाईप, आवश्यक सामग्री, पंप वाहून नेण्यासाठी टेम्पो किंवा ट्राॅलीची व्यवस्था असते. पालिकेच्या ह प्रभागातील उपसा पंपाजवळ असे कोणतेही सामान आढळून येत नाही, अशा तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या.
‘पावसाळा आला की पालिका आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून पाणी उपसा पंप, बोटी आणि इतर सोयीसुविधांची तयारी करते, मग पुरेसे उपसा पंप डोंबिवली पश्चिम ह प्रभाग क्षेत्रात प्रशासनाने का उपलब्ध करून दिले नाहीत. डोंबिवली पश्चिम खाडी किनारचा भाग आहे. मुसळधार पाऊस असला की या भागातील नागरी वस्तीत नेहमीच पुराचे पाणी घुसते. एकाचवेळी अनेक भागात पावसाचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने नागरिक, लोकप्रतिनिधी पाणी उपसा पंपाची पालिकेकडे मागणी करतात.
मागणीप्रमाणे प्रत्येक भागात उपसा पंप उपलब्ध झाले पाहिजेत. ह प्रभाग क्षेत्रात एकच उपसा पंप उपलब्ध करून देऊन प्रशासन नागरिकांचा अंत पाहत आहे. एक पंप उपलब्ध आहे तर त्याला पाईप आणि आवश्यक सामग्री नाही. हा अवजड पंप सहज उचलून नेणे शक्य नाही. यासाठी ट्राॅली पाहिजे. खासगी वाहनाने हा पंप नागरिकांनी उचलून नेला तर त्याचे भाडे कोण देणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पावसाच्या काळात ह प्रभागात पुरेसे उपसा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
तसेच, पावसाच्या काळात तांत्रिक, आपत्कालीन, आरोग्य विभागात प्रशासनाने पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुननिरीक्षण कामासाठी बहुतांशी कर्मचारी गेल्याने पालिकेच्या प्रशासकीय कामावर त्याचा परिणाम झाला आहे.
