कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील सत्ताधारी पक्षातील दोन नगरसेविका आपल्या पतीने केलेल्या बेकायदा इमारत बांधकामांमुळे अडचणीत आल्या आहेत. एका घरातील रक्ताच्या नात्यामधील कोणीही बेकायदा बांधकाम केले तर त्या घरातील लोकप्रतिनिधीचे लोकप्रतिनिधी पद अपात्र ठरविण्याची कायद्यात तरतूद आहे. या तरतुदीप्रमाणे एका तक्रारदाराने राज्य निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे या दोन नगरसेविकांची पदे बेकायदा बांधकाम विषयावरून रद्द करण्याची मागणी केली आहे.
या मागणीप्रमाणे कोकण विभागीय आयुक्तालयातील नगरपरिषद प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र पाठवून या नवनिर्वाचित नगरसेविकांवर प्राप्त तक्रारीप्रमाणे योग्य ती कायवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईतील एक नगसेविका यापूर्वीही नगरसेविका होती. तर, एक नगरसेविका प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. अन्य एक नगरसेवक आपल्या चिरंजिवाच्या बेकायदा बांधकाम उद्योगामुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यांचीही तक्रार राज्य निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते कल्पेश जोशी यांनी केली आहे.
अहवाल पाठवा
या दोन्ही नगरसेविकांचा बेकायदा इमारत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे कागदोपत्री पुरावे आणि या दोन्ही नगरसेविकांचा त्यांच्या पती आणि सासऱ्याने केलेल्या बेकायदा इमारत, बंगला बांधकामामध्ये कसा थेट संबंध आहे याची सत्य प्रतिज्ञापत्रावर माहिती तक्रारदार जोशी यांनी निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे दिली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत कोकण विभाग नगरपरिषद प्रशासनाचे सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र पाठवून या दोन्ही नगरसेविकांवर प्राप्त तक्रारीप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल पाठिविण्याची मागणी केली आहे. याप्रकरणामुळे या दोन्ही नगरसेविकांची पदे धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी पालिकेत एकूण दहा नगरसेवक बेकायदा बांधकामांमुळे अपात्र होण्याच्या यादीत होते. यामधील दोन जण अपात्र ठरले होते
अर्जात खोटी माहिती
डोंबिवली पश्चिमेतील एका माजी नगरसेवकाचा आरव हाईट्स या बेकायदा इमारतीत थेट संबंध आहे. पालिकेने ही इमारत अनधिकृत घोषित केली आहे. या इमारतीची सर्व बनावट कागदपत्रे तयार करून ही इमारत उभारण्यात एका माजी नगरसेवकाचा प्रत्यक्ष सहभाग आढळल्याने या माजी नगरसेवकावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या माजी नगरसेवकाची पत्नी आता नगरसेविका म्हणून निवडून आली आहे.
डोंबिवली पश्चिमेत अन्य एका नगरसेविकाच्या सासऱ्याने बेकायदा बंगला उभारला आहे. बाजुला अन्य एक बेकायदा इमारत उभारली आहे. या प्रकरणाशी या नगरसेविकेच्या पतीचा थेट संबंध येत आहे. या दोन्ही नगरसेविकांनी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम, १०, मुंबई पालिका अधिनियम १९४९ च्या १० (१ड), १६(१ड) तरतुदीनुसार मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरेन, असे लिहून दिले आहे.
आठ जण अडचणीत
डोंबिवली पश्चिमेतील आठ नगरसेवक, नगरसेविका बेकायदा इमारत प्रकरणी अडचणीत आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालय, निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल आहेत.
आपण सत्य प्रतिज्ञापत्राव्दारे या नगरसेविकांच्या पतींनी केलेल्या बेकायदा इमारतींची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. या दोन नगरसेविकांसह अन्य एक नगरसेवक त्याच्या चिरंजिवामुळे अडचणीत येणार आहेत. – कल्पेश जोशी, तक्रारदार

