डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. मोकळ्या मैदानांवर बेकायदा बाजार भरविले जात आहेत. या बेकायदा बांधकामे आणि बाजारांवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग विभागाकडून वरिष्ठांनी आदेश देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक, तक्रारदार त्रस्त आहेत.

कोपर, सरोवर नगर भागातील एकूण ३०० बेकायदा चाळींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एक तक्रार नागरिक मागील १५ दिवसांपासून मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसला आहे. या तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेने कारवाई करावी आणि उपोषणकर्त्याला उपोषणापासून परावृत्त करावे, असे गेल्या दोन महिन्याच्या काळात शासनाच्या नगरपरिषद संचालनालय, नगरविकास विभागाच्या वरिष्ठांनी पालिकेला कळवूनही पालिकेने डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा चाळींवर कारवाई केलेली नाही.

कोपर-मोठागाव रस्त्यावर बेकायदा

कोपर गाव मधील ९० फुटी रस्त्यावरील म्हाळसाई चाळ भागात यापूर्वीच ७० बेकायदा चाळींची बांधकामे भूमाफियांनी केली आहेत. याच भागातील इंदुबाई म्हात्रे चाळ भागात बेसुमार चाळीची बांधकामे भूमाफियांकडून दिवस रात्र सुरू आहेत. ही बांधकामे सुरू असतानाच आत भूमाफियांनी कोपर -मोठागाव-माणकोली उड्डाण पूल रस्त्यावरील मोकळ्या सरकारी, काही खासगी जमिनींवर हरितपट्टा नष्ट करून पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू केली आहेत.

या बेकायदा चाळींची तक्रार, गुप्त माहिती पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात दिली की या कार्यालयातील काही कर्मचारी ही माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी, भूमाफियांना देऊन तक्रारदारांना लक्ष्य करून हा विषय दडपण्याचा प्रयत्न करतआहेत.

एकमेव हरितपट्टा नष्ट

डोंबिवली पश्चिमेत खाडी किनारी एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. या हरितपट्ट्यामुळे या भागातील जैवविविधता नष्ट होत आहे. ह प्रभागातील एक अधिकारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई न करता आता शांत राहण्याची भूमिका या अधिकाऱ्याने घेतली असल्याची चर्चा आहे. ह प्रभागातील एक अधिकारी, अतिक्रमण नियंत्रण पथकातील एका ठाणमांड्या एका कर्मचाऱ्याच्या अनेक तक्रारी काही जाणकारांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत.

रस्ते मार्गात अडथळा

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून माणकोली पुलाकडे जाण्यासाठी पंडित दिनदयाळ रस्ता हा एकमेव रस्ता होता. अलीकडे कोपर भागातून ९० फुटी रस्त्याने थेट माणकोली पुलाकडे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे या भागातील अनेक वर्ष अडगळीत असलेली सीआरझेड, सरकारी, गावठाण जमीन चर्चेत आली आहे. या जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी भूमाफियांनी या प्रशस्त रस्त्यालगत बेकायदा चाळी उभारण्यास सुरूवात केली आहे.

या बेकायदा चाळींमुळे या प्रशस्त रस्त्याच्या मार्गात येत्या काळात अडथळे उभे राहणार आहेत. या चाळी उभारणीसाठी रस्त्याच्या बाजुला भराव करण्यात येतात. त्यामुळे खाडीचे पाणी पावसाळ्यात ९० फुटी रस्त्यावर येऊन हा रस्ता थोड्याशा पावसात जलमय होण्याची शक्यता आहे. या बेकायदा चाळींविषयी साहाय्यक आयुक्त सावंत यांना संपर्क केला. तो होऊ शकला नाही.