डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात वर्तुळकार (बाह्य वळण रस्ता) रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे या भागातील अनेक सोसायट्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांसमोर खोदून ठेवण्यात आले आहे. उन्ह्याळ्यात या कामाच्या ठिकाणाहून उडणाऱ्या धुळीने रहिवासी त्रस्त होते. आता पावसात या भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांना या भागातून चालणे, वाहने सोसायटीच्या आवाराबाहेर काढणे, मुलांना शाळेत नेताना दररोज मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागते.

या रस्ते कामाच्या ‘एमएमआरडीए’च्या ठेकेदाराला या भागातील सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून, पत्रे देऊन सोसायट्यांसमोरील ये-जा करण्याचे रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी केली. ठेकेदाराने, संपर्क केलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. हे रस्ते थेट एमएमआरडीएच्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांना याविषयी सांगूनही त्यांचे याठिकाणी काही चालत नसल्याने त्यांचीही कोंडी झाली आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

सोसायटी प्रवेशव्दार चिखलात

टिटवाळा, कल्याण, डोंबिवली ते शिळफाटा काटई, हेदुटणे असा कल्याण,डोंबिवली शहराबाहेरून जाणाऱ्या २१ किमी लांबीच्या रस्त्याचे काम ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे. या रस्त्याचे टिटवाळा ते कल्याण भागातील कामे पूर्ण झाली आहेत. आता या रस्त्याचे कल्याणमधील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी रस्ता ते कचोरे, खंबाळपाडा खाडी किनारा, गणेश नगर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा ते मोठागाव माणकोली उड्डाणपूल रस्त्याचे काम सुरू आहे.

हे काम करताना कुंभारखाणपाडा भागातील ‘यश एनक्लेव्ह’ आणि परिसरातील सहा ते सात सोसायट्यांसमोरील भाग रस्ते कामासाठी आठ महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या हालात भर पडली आहे. तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदाराने उंचवटा करून त्यावरून रहिवाशांना ये-जा करण्यासाठी माती, खडी आणून टाकली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून या माती, खडीचा चिखल झाला आहे.

या चिखलातून सोसायटीतील रहिवाशांची वाहने, रिक्षा, शालेय बसची ये-जा सुरू आहे. मुसळधार पावसात खोदकाम केलेल्या रस्त्याला नदीचे स्वरूप येते. शाळेत मुलांना या भागातून घेऊन जाताना विशेष काळजी पालकांना घ्यावी लागते, असे रहिवाशांनी सांगितले.

सोसायटीची तक्रार

या समस्येविषयी ‘यश एनक्लेव्ह’ सोसायटीचे अध्यक्ष संतोष मोहंती, सचिव समीर देशमुख, कोषाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी भाजप युवा मोर्चाचे डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांना पत्र देऊन आपल्या सोसायटीसमोरील रस्ता सुस्थितीत करणे, रिक्षा वाहनतळाचे योग्य नियोजन आणि या भागात रस्ते खोदाईमुळे विस्कळीत झालेली पथदिव्यांची साखळी पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. उपाध्यक्ष म्हात्रे यांनी यासंदर्भात आपण एमएमआरडीएच्या वरिष्ठांशी बोलून या रस्त्याच्या खोदकामामुळे निर्माण झालेले प्रश्न आणि ते तातडीने सोडविण्यासाठी ठेकेदाराला योग्य सूचना देण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन रहिवाशांना दिले आहे.

आपण सांगूनही ‘एमएमआरडीए’ने या भागातील रस्ते सुस्थिती केले नाही तर मात्र या भागातील रहिवाशांच्या पुढाकाराने आपण या भागात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजपचे अनमोल म्हात्रे यांनी दिला आहे.