डोंबिवली : गणेशोत्सव आठ दिवसावर आला आहे. दहीहंडी उत्सवाची धूम सुरू आहे. या सण, उत्सवांच्या काळात डोंबिवली, कल्याणमधील रस्त्यांवरील वाहतूक सहजसुलभ व्हावी यासाठी प्रयत्न न करता दोन दिवसांपूर्वी पालिकेने डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर दोन पाणी टाकीजवळील साफल्य व राधा दलाल बंगल्यांसमोर मोठा खड्डा खोदून ठेवल्याने प्रवासी, वाहन चालक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या खड्डयामुळे अवजड वाहनांमुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

हा रस्ता पालिकेच्या कोणत्या विभागाने खोदून ठेवला आहे याची कोणतीही अचूक माहिती नागरिकांना मिळत नसल्याने काही जागरूक नागरिक पालिकेच्या जल, मलनिस्सारण विभागांत फेऱ्या मारत आहेत. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला या खड्ड्यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी हा खड्डा आमच्या विभागाने खोदला नसल्याचे स्पष्ट केले. इतर विभागात चौकशी केली. त्यांनी या विषयीची माहिती घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले.

वर्दळ रस्त्यावर खड्डा

गणेशोत्सव काळात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते वाहतूक कोंडी मुक्त, डांबरीकरणाने सुस्थितीत करण्याचे आयु्क्त अभिनव गोयल यांचे आदेश आहेत. अशा स्थितीत महात्मा फुले रस्त्यावर दोन पाण्याच्या टाक्यांच्याजवळ विकासक मिलिंद देशमुख यांचा साफल्य बंगला व प्रमोद दलाल यांच्या राधा दलाल बंगल्या समोर मोठा खड्डा दोन दिवसांपूर्वी पालिकेकडून खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यात जल, मलनिस्सारणाच्या वाहिन्या आहेत.

दोन पाण्याची टाकी ते श्रीधर म्हात्रे चौक रस्ता सुस्थितीत करा. अनेक वर्षापासून या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण झालेले नाही. या अरुंद रस्त्यावरून रिक्षा, डम्पर, खासगी वाहने, पोकलेन, खननयंत्र यांची सतत वर्दळ असते. या अरुंद रस्त्याच्या दुतर्फा नवी इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. हा रस्ता सुस्थितीत करा म्हणून श्रीधर म्हात्रे चौक भागातील नागरिकांनी काही दिवसापूर्वी पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

गणेशभक्तांना अडथळा

दोन पाण्याची टाकी ते श्रीधर म्हात्रे चौक रस्ता सुस्थितीत न करता या रस्त्यावर आता मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. एकदा खड्डा खोदला की त्याकडे किमान दोन महिने फिरकायचे नाही ही पालिका अधिकारी आणि पालिका ठेकेदाराची पद्धत आहे. त्यामुळे या खड्ड्याचा त्रास गणेशोत्सव काळात नागरिक, गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्वाधिक होणार आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी हा खड्डा त्यामधील मल, जलवाहिन्यांची दुरुस्ती करून सुस्थितीत न केल्यास रहिवासी आंदोलन करतील, असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला.

रिक्षा संघटनेचा इशारा

अगोदरच महात्मा फुले रस्त्याचा दोन पाण्याची टाकी ते श्रीधर म्हात्रे चौक रस्ता, अनमोलनगरीचा रस्ता खराब आहे. हा रस्ता सुस्थिती नसल्याने प्रवाशांना कोंडीतून, वाहन चालकांना खडबडीत रस्त्यावरून जावे लागते. रस्ते सुस्थितीत करण्याची रिक्षा संघटनेची सतत पालिकेकडे मागणी आहे. असे असताना पुन्हा वर्दळीच्या रस्त्यावर खड्डा खोदल्याने रिक्षा चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा खड्डा गणपतीपूर्वी बुजविला नाहीतर मात्र रिक्षा चालक पालिकेवर मोर्चा काढतील, असा इशारा रिक्षा चालक युनियनचे शेखर जोशी यांनी दिला.

लोकांना सुस्थितीत रस्ते मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जागोजागी रस्ते खोदणे आणि ते माती, दगड टाकुन बुजविणे असा कसा पालिका अधिकाऱ्यांचा उपक्रम सुरू आहे. या सततच्या निष्क्रिय, लोकांना त्रास देणाऱ्या नाकाम कामांमुळे एक दिवस लोक मोठे आंदोलन पालिके विरूध्द करतील, असे मत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांनी व्यक्त केले. तो खड्डा बुजविण्याची मागणी पालिकेकडे केली.