डोंबिवली – डोंबिवली शहर परिसराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, शहरात सुरू असलेले नवीन गृहप्रकल्प आणि घर खरेदीदारांची वाढती, मुद्रांक शुल्क विषयक इतर कामे ही संख्या विचारात घेऊन डोंबिवली पश्चिमेत लवकरच नवीन जागेत एक सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार आहे. या कार्यालयासाठी नोंदणी आणि मुद्रांंक शुल्क महानिरीक्षकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. सुयोग्य जागेची उपलब्धी बघून हे नवीन कार्यालय लवकरच डोंबिवली पश्चिमेत सुरू केले जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी येथे दिली.

डोंबिवली पश्चिमेतील या कार्यालयासाठी आपण मागील काही महिन्यांपासून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे पाठपुरावा करत होतो. अनेक नागरिकांची आपल्याकडे अशाप्रकारची मागणी होती, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेत एकमेव सह दुय्यम निबंधक कार्यालय आहे. याठिकाणी डोंबिवली शहर परिसर, कल्याण शिळफाटा रस्त्यावरील नवीन गृहसंकुले याठिकाणची घर खरेदीची नोंदणीकरणे, डोंबिवलीत अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू झाली आहेत. या इमारतींमध्ये अनेक रहिवासी हे वृध्द, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना पुनर्विकास इमारतीमधील दस्त नोंदणीकरण कामासाठी काही तास सह दुय्यम निबंधक कार्यालयात क्रमांक येईपर्यंत ताटकळत बसावे लागते.

डोंबिवलीत गांधीनगरमध्ये एकच सह दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने या कार्यालयावर दस्त नोंदणीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा भार येतो. वाढते नागरीकरण विचारात घेऊन आपण पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकांकडे डोंबिवली पश्चिमेसाठी स्वतंत्र सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे म्हणून पाठपुरावा केला जातो. आवश्यक मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करून या कार्यालयासाठी पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेत हे कार्यालय सुरू झाले की डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना दस्त नोंदणीकरण प्रक्रियेसाठी डोंबिवली पूर्व गांधीनगर भागात जाण्याचा त्रास वाचणार आहे. कल्याणमध्ये अशाप्रकारची चार कार्यालये आहेत. तशीच सुविधा डोंबिवलीत आता उपलब्ध होईल. शासनाच्या गतिमान प्रशासनाचा अनुभव नागरिकांना येईल, असे प्रदेशाध्यांनी सांगितले. या सर्व कामासाठी आपणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाचे सहकार्य मिळाले, असे ते म्हणाले.

यापूर्वी डोंबिवली शहरात एकच शिधावाटप कार्यालय होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दहा वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयासाठी हालचाली केल्या. त्यामुळे पश्चिमेसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामासाठी नागरिकांना ठाणे येथे जावे लागते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण, डोंबिवलीत निवासी जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे नागरिकांचा ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा त्रास वाचेल, अशी नागरिकांची मागणी आहे.

डोंबिवली शहरातील वाढते नागरीकरण, घर खरेदीदारांची वाढती संख्या विचारात घेऊन नागरिकांना विशेषता ज्येष्ठ, वृध्द यांना झटपट दस्त नोंदणीकरण करून मिळाले पाहिजे. नागरिकांच्या हिताचा विचार करून लवकरच डोंबिवली पश्चिमेत सुयोग्य जागा मिळाली की स्वतंत्र नवीन सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होईल. – रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप.