डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली टेकडी भागात मंगळवारी सकाळी एका दुचाकी स्वाराने रस्त्याच्या कडेला बसलेल्या श्वानाच्या पिल्लाला धडक दिली. हे पिल्लू धडक बसताच ओरडू लागले. यावेळी तेथून जाणाऱ्या एका ३५ वर्षाच्या महिलेने दुचाकी स्वाराला तुमची दुचाकी पिल्लापासून मागे घ्या असे सांगितले. त्यानंतर दुचाकी स्वाराने जवळील शाळेच्या पिशवीने पिल्लाला मारहाण सुरूवात केली. महिलेने त्यात हस्तक्षेप करताच दुचाकी स्वाराने महिलेला शिवागाळ करत त्यांना मारहाण करत त्यांचा विनयभंग केला.

या महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी आणि श्वानाच्या पिल्ला केलेल्या इजेप्रकरणी तक्रार केली आहे. या मारहाणीनंतर दुचाकी स्वार घटनास्थळावरून पळून गेला. या महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण कुटुंबीयांसह नांदिवली टेकडी भागात राहतो. मंगळवारी सकाळी मी राहुल हेअर सलून दुकानासमोरून किराणा दुकानात पायी चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका श्वानाच्या पिल्लाला एका दुचाकी स्वाराने (एमएच ०५ ईसी २६१७) जोराची धडक दिली. त्यावेळी श्वानाचे पिल्लू धडक बसल्याने मोठ्याने ओरडू लागले. धडक बसुनही दुचाकी स्वार दुचाकी मागे घेत नव्हता. म्हणून मी दुचाकी स्वाराला तुझी दुचाकी मागे घे म्हणजे पिल्लू उठेल असे सांगितले.

यावेळी दुचाकी स्वाराने तुम्ही माझ्या विषयात पडू नका. पिल्लू तुमचे नाही ना, मग या पिल्ला मी मारून टाकेन नाहीतर काहीही करेन.तुम्ही मध्ये पडू नका असे बोलून त्याने जवळील दप्तराने पिल्लाला मारहाण सुरू केली. हा दुचाकी स्वार सांगुनही ऐकत नसल्याने हा माणूस वेडा आहे की काय, असा प्रश्न महिलेने केला. दुचाकीच्या चाकाची धडक बसल्याने पिल्लू अस्वस्थ झाले होते. आजुबाजुची लोक पिल्लाच्या साहाय्यसाठी धावली होती.

यावेळी संतप्त झालेल्या दुचाकी स्वाराने या महिलेच्या जवळ येत त्यांना मला काय बोलता असे विचारात शिवीगाळ केली. आणि त्यांच्या गालावर हाताने चापट मारून त्यांचा विनयभंग केला. यानंतर हा दुचाकीस्वार तेथून पिल्लाला कोणतीही मदत न करता निघून गेला. श्वानाच्या पिल्ला इजा केल्याप्रकरणी आणि आपला विनयभंग केला म्हणून या महिलेने या दुचाकी स्वारा विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दुचाकी स्वाराचा शोध सुरू केला आहे