डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौक भागात कलावती आई मंदिर परिसरात राहत असलेल्या एका ३९ वर्षाच्या महिलेला तुमचे मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी भामट्याने घेतलेले पैसे परत मिळवून देतो. असे सांगून या महिलेशी लगट करून तिच्या बरोबर लग्न करण्याची तयारी दाखवून भांडुपमधील एका भामट्याने महिलेची चार लाख रूपयांची फसवणूक केली आहे.

ही ३९ वर्षाची पीडित महिला नोकरी करते. विवाहासाठी तिने समाज माध्यमातील एका डिव्होर्सी मेट्रोमॉनी या संकेतस्थळावर मनपसंत वरासाठी नोंदणी केली होती. या महिलेची संकेतस्थळावरील माहिती वाचून मुंबईतील भांडुप भागात राहत असलेल्या अभिजीत प्रभाकर फोंडकर (४२) याने संपर्क साधला. आपण अविवाहित आहोत. लग्नासाठी अपेक्षित वधू पाहत आहोत, असे सांगितले. पीडितेची अभिजीत बरोबर ओळख झाली. ते रोज एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.

हेही वाचा…Kalyan Crime News : आईचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता मुलगा, कुठे घडली घटना?

पीडितेला मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून दीपक पांचाळ या भामट्याने पीडितेकडून काही रक्कम उकळली होती. नोकरी न लावता पांचाळ पीडितेची फसवणूक करून पळून गेला होता. पीडितेची मंत्रालयात अडकलेली ही रक्कम पीडितेला परत मिळवून देण्याचे आश्वासन आरोपी अभिजीत याने पीडितेला दिले. अशाप्रकारे पीडितेचा विश्वास संपादन करून अभिजीत फोंडकर याने पीडिते बरोबर लग्न करण्याची तयारी दर्शवली. अभिजीत बरोबर विवाह होणार असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.

डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत अभिजीतने विविध कारणे देऊन पीडितेकडून तीन लाख ६५ हजार रूपये उकळले. आपला मोबाईल बंद झाला आहे. म्हणून पीडितेचा ३५ हजार रूपयांचा मोबाईल काही दिवस वापरासाठी घेतला. अभिजीत पीडितेच्या घरी येत होता. या कालावधीत त्याने पीडितेच्या घरातील २० हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरला. अशाप्रकारे पीडितेला अंधारात ठेऊन अभिजीतने चार लाखाहून अधिकचा ऐवज पीडित महिलेकडून काढून घेतला. त्यानंतर पीडितेशी संपर्क तोडून अभिजीत फरार झाला. पीडितेने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल बंद येऊ लागला.

हेही वाचा..१०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या अमिषाने लाखो गमावले

अभिजीतने गोडबोलून आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर पीडितेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. – पोलीस उपनिरीक्षक के. पी. देशमुख तपास करत आहेत.