डोंबिवली : आपल्या बँक खात्याचा लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी आपल्याविरुद्ध देशातील विविध भागांतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशाच गुन्ह्याच्या एका तपासात राजस्थान येथील पोलिसांनी सायबर सेल पोलीस ठाण्यात आपणास चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. याप्रकाराने चिंताग्रस्त असलेल्या डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली भागातील ३८ वर्षांच्या एका महिलेने मंगळवारी सायंकाळी धारदार पात्याने वार करून स्वत:चे जीवन संपवले.
देविका आरमुगम पंडारम असे मृत महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पूर्वेतील जिमखाना रस्त्यावरील सागर्ली गावातील साईराम सोसायटीत राहत होत्या. या महिलेची नातेवाईक उषा वेल्लार यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून घेतली आहे. देविका यांनी आपल्या राहत्या घरात हा आत्महत्येचा प्रकार केला आहे.मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की देविका पंडाराम यांचे डोंबिवलीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या टिळक नगर शाखेत बँक खाते आहे. त्या नियमित आपल्या बँक खात्याचा वापर करत होत्या. ८ ऑगस्ट रोजी राजस्थान येथून चुरू पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे पोलिसांचे पथक देविका पंडाराम यांच्या डोंबिवलीतील सागर्ली येथील घरी आले होते.
या पोलिसांनी देविका यांना आपल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील बँक खात्याचा वापर ऑनलाइन माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी करण्यात आला आहे. या बँक खात्याशी निगडित व्यवहारप्रकरणी राजस्थान येथील चुूरू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३१८(४), ६१(२) सह माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आपणास चौकशीसाठी चुरू सायबर पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी नोटीस पोलीस पथकाने देविका पंडाराम यांना दिली होती.
आपण कधीही नियमबाह्य पद्धतीने आपल्या बँक खात्याचा वापर केला नाहीतरी, आपणास राजस्थान पोलिसांनी ही नोटीस का दिली. याची चौकशी करण्यासाठी देविका पंडाराम ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर गु्न्हे विभागात गेल्या होत्या. तेथील अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन तुमच्या बँक खात्याचा वापर करून अनेक लोकांची फसवणूक झाले असल्याचे देविका यांना सांगितले. या प्रकरणी आपल्या विरुद्ध दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात व तमीळनाडू या राज्यांमधील सायबर पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी देविका यांना दिली.
हा सर्व प्रकार समजल्यावर भयभीत झालेल्या देविका अस्वस्थ होत्या व त्याच विचारात त्यांनी सागर्ली येथील घरी असताना मंगळवारी दुपारी चार वाजता देविका पंडाराम यांनी आपल्या हाताची नस व गळ्यावर धारदार पात्याने वार केले. त्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. नातेवाईकांनी देविका यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून देविका यांना तातडीने पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात नेण्याची सूचना केली. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी देविका यांना तपासले. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी कल्याणमधील अत्रे रंगमंदिरासमोरील एका व्यावसायिकाच्या बँक खात्याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
