डोंबिवली – सार्वजनिक ठिकाणी धार्मिक सण, उत्सवांच्या ठिकाणी जे कार्यक्रम सादर केले जातात, या कार्यक्रमांमधील अश्लील गाणी आणि नृत्य या विरोधात समाजात तीव्र नाराजी आहे. या बिभत्स संस्कृतीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी डोंबिवली महिला महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका आणि कार्यवाह ज्येष्ठ सनदी लेखापाल जयश्री कर्वे, ज्येष्ठ पत्रकार सई बने यांनी हे निवेदन ठाणे जिल्हा व बाल विकास विकास अधिकारी नमिता शिंदे यांना दिले आहे.धार्मिक सण, उत्सव साजरे करण्याची आपली पूर्वपरंपार प्रथा आहे. यापूर्वी हे सण समाजात साधेपणा, या सण, उत्सवांचे पावित्र्य राखून साजरे केले जात होते. पण आता हे सण,उत्सव म्हणजे लोकांना त्रास देण्याची नवीन परंपरा पुढे येत आहे. हे सण, उत्सव साजरे करण्याच्या नावाखाली अलीकडे सार्वजनिक मुख्य वर्दळीचे रस्ते, पदपथ बंद करून मंडप उभारले जात आहेत. या उत्सवांसाठी खेळाडुंची मैदाने अडवली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाज दणदणाटी वाद्ये वाजवून त्या परिसरात शांतता भंग केला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या उत्सवी कार्यक्रमाला गर्दी जमावी आणि तरुणांनी या कार्यक्रमांकडे आकर्षित व्हावे यासाठी बिभत्स नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांचा वापर करण्यात येतो.या कार्यक्रमात अश्लील नृत्यावर, अश्लील हावभाव करत नृत्य सादर केली जातात. बिभत्स भाषा वापरली जाते. या कार्यक्रमांमध्ये लहान मुले, मुली, त्यांचे पालक असतात.या मुलांच्या मनावर अशा नृत्याचा आणि भाषेचा विपरित परिणाम होतो.कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात राहणारे रहिवासी, विशेषता महिलांना लज्जास्पद वाटेल असे हे कार्यक्रम असतात. या संदर्भात डोंबिवली शहर परिसरातील अनेक महिलांनी डोंबिवली महिला महासंघाकडे या बिभत्स, दणदणाटी उत्सवी कार्यक्रमांविषयी नाराजी व्यक्त करून शासनस्तरावर आवाज उठवावा अशी मागणी केली.
या मागणीची दखल घेऊन डोंबिवली महासंघाने घेतली आहे.एकीकडे सरकार ‘पाॅश’ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक सारखे कायदे राज्यात कठोरपणे राबवावेत यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी समाजाला घातक असलेला सार्वजनिक ठिकाणी चालू असलेला हा धांगडधिंगा मात्र दुर्लक्षित केला जात आहे.यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यक्रमाची दखल घेऊन, आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवली महिला महासंघातर्फे करण्यात आली आहे.महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी डोंबिवली महिला महासंघाला यासंदर्भात सकारात्मक आश्वासन देऊन कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
