जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपक्रम

लोकसत्ता खास प्रतिनिधी डोंबिवली – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आश्रय चॅरिटेबल रुग्णालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ. अरूण पाटील आणि इतर दोन तज्ज्ञ महिला डाॅक्टरांच्या उपस्थितीत ९ मार्च ते १५ मार्च या कालावधीत रास्त दरात फक्त महिलांसाठी रक्त तपासणी आणि महिलांचा स्तनाचा कर्करोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन आश्रय चॅरिटेबल रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीतील मिलापनगर भागातील आश्रय चॅरिटेबल रुग्णालय (अभिनव बँकेजवळ) येथे हे शिबीर घेण्यात येणार आहे. डोंबिवलीतील राजाजी पथावरील आपले संजिवनी रुग्णालय बंद केल्यानंतर डाॅ. अरूण पाटील यांनी यापुढे आपले नियमितचे विशेष रुग्ण वार, वेळ देऊन तपासणे. आणि उर्वरित वेळेत आश्रय चॅरिटेबल रुग्णालयाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक कार्यात डाॅ. अरूण पाटील यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आश्रय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. अरूण पाटील, सचिव एन. आर. हेगडे आणि सहकाऱ्यांनी महिलांसाठी रास्त दरात रक्त तपासणी आणि स्तनाचा कर्करोग तपासणी करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरात डाॅ. अरूण पाटील यांच्या सोबत महिलांच्या स्तनाच्या कर्करोग तपासणी उपक्रमात डाॅ. विद्या पाष्टे, डाॅ. अंजली पाटील सहभागी होणार आहेत.

रक्त तपासणी प्रकार

सात दिवसांच्या शिबीर कालावधीत आश्रय रुग्णालयात महिलांच्या हिमोग्राॅम, रक्तामधील साखरेची पातळी, लिपिड प्रोफाईल, एचबीएवनसी, युरिक ॲसिड, आरए चाचणी या चाचण्या करून देण्यात येणार आहेत. या वैद्यकीय तपासणी चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी आश्रय चॅरिटेबल रुग्णालयात येऊन किंवा ९१३६८७३६८७ या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करून ठेवावी. तपासणीला येताना सकाळी नऊ पर्यंत काही खाऊ नये. त्यामुळे तात्काळ तपासणी आणि चाचणी अहवाल तयार करण्याची कामे तत्पर करणे शक्य होणार आहे, असे डाॅ. पाटील यांनी सांगितले.

मोफत सल्ला

रक्त तपासणी, स्तन कर्करुग्ण तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे चाचणी अहवाल तयार झाले की त्या अहवालांची पाहणी आणि संबंधितांना योग्य वैद्यकीय मोफत सल्ला देण्याचे पहिल्या टप्प्यातील काम ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ. अरूण पाटील करणार आहेत. अधिकाधिक महिलांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आश्रय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.