डोंबिवली – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे गुलमोहराच्या २५ रोपांचे रोपण करून वृक्षारोपण आणि जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम करण्यात आला.
वाढते उष्णतामान विचारात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी दिलेला संदेश विचारात घेऊन भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ पातळीवर, आपल्या भागात विविध झाडांची रोपे लावून ती दत्तक घेऊन जगवून मोठी केली पाहिजेत. आपण करत असलेली ही कृती हा खरा पर्यावरण दिन आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधानांच्या सूचनेप्रमाणे डोंबिवलीत पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सावळाराम महाराज क्रीडासंकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टाटा पाॅवर कंपनी परिसरात यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते गुलमोहर वृक्षाची रोपे लावण्यात आली. सावळाराम महाराज क्रीडासंकुलात वर्षभर दररोज लहान बालकांपासून ते ज्येष्ठ, वृध्दांपर्यंत नागरिक फिरण्यासाठी येतात. क्रीडासंकुलात खेळत असताना त्यांना झाडांची सावलीही मिळावी हा क्रीडासंकुलात झाडे लावण्याचा मुख्य उद्देश आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
गुलमोहराच्या झाडांची सावली दाट असते. क्रीडासंकुलात २५ गुलमोहराच्या झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. देश, राज्यभर भाजप कार्यकर्ते शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले आहेत. केवळ वृक्षारोपण करून शांत न बसता ती झाडे जगतील यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करायचे आहेत. या वृक्षारोपण मोहिमेत पर्यावरणप्रेमी, निसर्ग स्नेही संस्था सहभागी आहेत. त्यामुळे आज लावलेली झाडे पुढील वर्षी मोठी झालेली असतील याची विशेष काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
वाढते उष्णतामान विचारात घेता आता प्रत्येक नागरिकाने आपल्या घर परिसरात, मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षण संस्थांनी असे उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत. पर्यावरण संवर्धन किती महत्वाचे आहे हे बाल वयापासून विद्यार्थ्यांवर बिंबवले पाहिजे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमात भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक शशिकांत कांबळे, मंदार हळबे, नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, संतोष केणे, प्रणव केणे, महिला आघाडीच्या राजश्री पाजणकर आणि इतर महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
