ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ आणि तिरंगा रॅलीच्या आवाहनाला कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने जोरदार प्रतिसाद देत डोंबिवलीत विश्वविक्रमी तिरंगा रॅलीचे आयोजन केले; मात्र या भव्य सोहळ्याला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने चक्क दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आणि इतर सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या रॅलीत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो नागरिकांनी हातात घेऊन मार्गक्रमण केला. या विक्रमी उपक्रमाची World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या अधिकृत नोंद प्रक्रियेत नोंद झाली.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, रॅली सर्वपक्षीय स्वरूपाची असेल, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, चिन्ह अथवा पक्षाचे नाव ठेवण्यात आले नव्हते. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. एकही प्रमुख भाजप नेता रॅलीत सहभागी न झाल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर चौकापर्यंत विशाल तिरंगा घेऊन नागरिकांनी मार्गक्रमण केले. रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीते, घोषणांनी वातावरण भारून गेले होते. मुसळधार पावसाने रॅलीच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. मात्र, पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
डोंबिवली आणि परिसरातील ५० हून अधिक शाळांमधील १० हजारांहून अधिक विद्यार्थी, १०० हून अधिक सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी-एनएसएस कॅडेट तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. सुमारे २५ हजार नागरिकांनीही या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्याला उपस्थिती लावली. रॅलीचा समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते १५० फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा रॅलीतून नेण्याच्या या विक्रमी उपक्रमाची World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या अधिकृत नोंद प्रक्रियेत नोंद करण्यात आली. त्यामुळे डोंबिवलीतील हा तिरंगा सोहळा केवळ स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवापुरता मर्यादित न राहता विश्वविक्रमाच्या नोंदीमुळे ऐतिहासिक ठरला. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली ही रॅली सर्वपक्षीय स्वरूपाची ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले असले, तरी भाजपच्या प्रमुख स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि विविध नामांकित सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने या विश्वविक्रमी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता. देशप्रेमाचा कार्यक्रम होता. त्यामुळे या ठिकाणी जे नाही आले ते त्यांचे दुर्दैव. मात्र या ठिकाणी सर्वसामान्य डोंबिवलीकर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. – राजेश कदम, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना</strong>
