डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सागाव मधील एका २१ वर्षाच्या तरूणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी जवळील पडले गावातील एका २१ वर्षाच्या तरूणी विरुध्द तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
साहिल सहदेव ठाकुर (२१) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण आपल्या आई, वडिलांसह सागाव वरचापाडा भागात राहत होता. सहदेव हे खाणावळ चालवत आहेत. त्यांची पत्नी सागाव भागात अंगणवाडी सेविका आहे. गेल्या आठवड्यात साहिलने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या आत्महत्येस पडले गावातील एक मुलगी कारणीभूत असल्याची माहिती मिळाल्यावर भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष मनीषा राणे यांनी ठाकुर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी मृत साहिल आणि पडले गावातील तरूणी यांचे मोबाईलवरील संभाषण तपासले. त्यावेळी गुन्हा दाखल तरूणी साहिलला मरण्याचा सल्ला देत होती असे दिसते.
या तरूणीमुळेच साहिलने आत्महत्या केल्याचे समजल्यावर मनीषा राणे यांनी मंगळवारी ठाकुर कुटुंबायांना घेऊन मानपाडा पोलीस ठाणे गाठले. साहिल आणि त्या मुलीमधील मोबाईलमधील संभाषण मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना दाखविले. या मुलीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी मनीषा राणे यांनी पोलिसांकडे केली.
पोलिसांनी मोबाईलमधील साहिल आणि पडले गावच्या तरूणीमधील संभाषण तपासले. त्यात तरूणी साहिलला मरण्याचा सल्ला देत असल्याचे दिसत होते. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी साहिलच्या मैत्रिणी विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
साहिलचे वडील सहदेव ठाकुर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, गेल्या आठवड्यात मी पत्नीसह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलो होतो. या कालावधीत साहिल घरात एकटाच होता. त्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साहिलचा आयफोन मोबाईलमधील इतरां बरोबरील संभाषण (चॅट) तपासले. त्यामध्ये बबली नावाने एक मोबाईल क्रमांक स्थापित होता. साहिलच्या मृत्युच्या दिवशी गुन्हा दाखल तरूणी आणि साहिल रात्री दोन ते पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत मोबाईलवर संभाषण करत होते, असे मोबाईलमध्ये दिसून आले.
या संभाषणामध्ये साहिल आणि तरूणी यांच्यात वाद सुरू होता असे दिसते. ती साहिलला घरात कोणी नाही, तू फास घे. मर. नवी साडी फास घेण्यासाठी घेऊ नकोस. जुनी साडी घे. मरतोस ना बोल. या संभाषणानंतर दोघांमधील संवाद बंद झाला. मानसिक तणाव असह्य झाल्याने साहिलने राहत्या घरात गळफास घेतला. साहिलचे वडील, आई सकाळी साडे सात वाजता बाहेरून घरी परतले. तेव्हा त्यांना साहिलने गळफास घेतला असल्याचे समजले.
भाजपच्या पदाधिकारी मनीषा राणे यांनी ठाकुर कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेत साहिलच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका पोलिसांसमोर घेतली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.