डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालय परिसर, सोनारपाडा, डोंबिवली नागरी सहकारी बँक भाग आणि मालवण किनारा हाॅटेल परिसरात शनिवारी, रविवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर काळे ठिपके पडले असल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रदुषणाचा प्रकार असल्याच्या तक्रारीत करत एमआयडीसीतील नागरिकांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले.

हे काळे ठिपके वाहनांवर अधिक प्रमाणात पडले असल्याचे दिसून येत आहे. हे काळे डाग नक्की कोणत्या रसायनांचे आहेत हे स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसीतील रहिवाशांना एम्स रुग्णालय परिसर, सोनारपाडा भाग, मालवण किनारा मेट्रो मार्ग भागातील वाहनांवर अधिक प्रमाणात रसायनांचे काळे डाग पडले असल्याचे दिसून आले. हे काळे डाग वाऱ्याने उडून आले असावेत म्हणून वाहन मालकांनी ते पाण्याने काढून टाकण्याचा प्रयत्न केला. ते डाग निघत नव्हते. जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, क्षेत्रिय अधिकारी उज्जवला वाडेकर यांना ही माहिती दिली. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांना हा प्रकार समजल्यावर ते एम्स रुग्णालय परिसरात दाखल झाले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाडेकर, उद्योजक सोनी आणि राजू नलावडे आणि इतर जागरूक नागरिक यांनी एम्स रुग्णालय परिसरात जाऊन काळे डाग किती वाहनांवर आणि परिसरात पडले आहेत याची पाहणी केली. डोंबिवली नागरी सहकारी बँक परिसर, एम्स रुग्णालय भागात वाहनांवर काळे डाग पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहणी पथकाला दिसून आले.हे काळे डाग वाहनांवरून खरवडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते पुसले जात नव्हते. दोन दिवसांपूर्वी धूळ वादळ आले. एमआयडीसीत पाऊस ठिबकला होता. त्या कालावधीत झाडांवर उडालेले रसायन या भागात पसरले का, अशा शक्यता वर्तविण्यात येत होत्या.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या काळ्या डागांचे काही कण जमा करून तपासणीसाठी पाठवून दिले. या भागातील वाहन दुरुस्ती कार्यशाळा चालकांनी शनिवारीच हे काळे ठिपके आम्हाला वाहनांवर दिसत होते, अशी माहिती पथकाला दिली.एमआयडीसी भागात वाहनांवरील काळ्या डागांची सखोल पाहणी केली आहे. यासंदर्भात एक अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठविण्यात येईल. या अहवालातून योग्य ती माहिती स्पष्ट होईल. उज्जवला वाडेकर क्षेत्रिय अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळ.

वाहनांवरील काळे डाग नक्की कोठुन आले याचा तपास करण्याचा प्रयत्न केला. त्याचा उलगडा होत नाही. दोन दिवसांंपूर्वी झालेल्या पावसामुळे झाडांवरील काही कण वाहनांवर उडाले का अशा अनेक शक्यता आहेत. हे काळे डाग नक्की कसले आहेत हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. देवेन सोनी अध्यक्ष,

कामा संघटना काळ्या ठिपक्यांमुळे एमआयडीसीतील अनेक वाहने खराब झाले आहेत. हा गंभीर प्रकार आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
राजू नलावडे जागरूक नागरिक.