ठाणे : महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागली असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या वाढीव आकृतीबंधाच्या आराखडय़ास नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या आराखडय़ानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८८० पदांमध्ये ८७८ पदे आरोग्य विभागाची असल्याची बाब समोर आली असून उर्वरित दोन पदे उपायुक्त पदाची आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात २०१२ च्या जनणगणेनुसार १८ लाख ४१ हजार इतकी लोकसंख्या आहे. करोना संकटामुळे २०२१ मध्ये जणगणना करण्यात आलेली नाही. असे असले तरी गेल्या दहा वर्षांत महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महापालिकेच्या ताफ्यात ९८०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या मानाने पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे.
शहराची लोकसंख्या वाढत असली तरी त्या तुलनेत पालिका अधिकारी आणि कर्मचारी संख्येत वाढ झालेली नव्हती. यामुळे शहरात नागरी सुविधा पुरविताना पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सद्यस्थिती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ८८० पदांच्या निमिर्तीसाठी वाढीव आकृतीबंध आराखडा तयार केला होता. त्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याने पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंजूर झालेल्या ८८० पदांमध्ये ८७८ पदे आरोग्य विभागाची तर दोन पदे उपायुक्त पदाची आहेत.
करोना काळात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पालिकेला कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागली होती.
या काळात गेले अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या आरोग्य विभागाचे महत्त्व पालिका प्रशासनाला समजले होते. यातूनच पालिकेने आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पाऊले उचलल्याचे आकृतीबंधमधून दिसून येत आहे.
या पदांचा समावेश..
उपायुक्त, आरोग्य विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपवैद्यकीय अधीक्षक, इन्टेसिव्हिस्ट, वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, फिजीशयन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, दंत वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक संशोधन अधिकारी, ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी, डेमॉन्स्ट्रेटर, वैद्यकीय अधिकारी (आयुष), क्लिनिक इन्स्ट्रक्टर, सीनियर केमीस्ट, ज्युनीयर वैज्ञानिक रिसर्च अधिकारी, आरोग्य शिक्षक, सहायक मेट्रन यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे.