नोकरदारवर्गाची प्रवासात फरपट; खराब रस्ते, वाहतूक कोंडी, वाढलेले इंधनदर आणि अंगदुखी

ठाणे : लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण नसल्याने लोकलने प्रवास करण्यावर बंदी आणि रस्तेमार्गे कार्यालय गाठायचे तर, सगळीकडे वाहतूक कोंडी. करोनाच्या कठीण कालखंडातून आधीच चाचपडत प्रवास करत असलेल्या सर्वसामान्य नोकरदार, व्यावसायिक वर्गासमोर प्रत्यक्षातल्या खडतर प्रवासाचा प्रश्न करोनापेक्षाही गंभीर बनला आहे. घर ते कार्यालय आणि पुन्हा कार्यालय ते घर या प्रवासातच दिवसातले पाच ते सहा तास खर्ची पडू लागले आहेत. आधीच करोनामुळे वेतनकपात आणि त्यात वाढलेल्या इंधनदरांची कुऱ्हाड. अशा परिस्थितीत स्वत:च्या वाहनानेही हे दिव्य पार करताना महिन्याचे आर्थिक गणित कोलमडून पडत आहे. यामुळे होणारा मानसिक त्रास कमी म्हणून की काय, खड्डय़ांतील प्रवासामुळे जडलेली अंगदुखीही आता सहन होईनाशी झाली आहे.

करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या नागरिकांनाच उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, सततच्या लसतुटवडय़ामुळे असंख्य नागरिक अजूनही लोकलपासून वंचित आहेत. अशा नागरिकांना रस्ते प्रवासाशिवाय पर्यायच नाही. मुंबई-नाशिक महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या यात लक्षणीय आहे. कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्यांच्या खासगी वाहनांचा भारही या महामार्गावर आला आहे. या मार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका येथे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचा परिणाम आता नागरिकांच्या अर्थचक्र, आरोग्य आणि दिनचर्येवर पडू लागला आहे. 

घोडबंदर येथील मानपाडा भागात राहणारे योगेश गांगुर्डे यांना मानपाडा ते मुंब्रा या प्रवासासाठी दररोज ४० ते ५० रुपये मोजावे लागत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांच्या वाहनाचा इंधनखर्च दीडशे रुपयांवर पोहोचला आहे. घोडबंदरमधीलच अमित शेलार यांना तर रोजच्या वाहतूक कोंडीचा परिणाम वेतन कपातीमध्ये होईल, अशी भीती सतावते. ‘काहींना कार्यालयीन बैठकाही वेळेत पार पाडणे कठीण झाले आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे,’ असे ते म्हणाले.

आरोग्याच्या समस्या

दररोज वाहतूक कोंडीमुळे पाठदुखी आणि मानेचा त्रास होतो. त्यामुळे घरी आल्यावर रात्री झोपही लागत नसल्याचे ओमकार डोके या हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या तरुणाने सांगितले. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सोनोने यांनीही ओमकारसारख्या प्रवाशांच्या समस्येला दुजोरा दिला. ‘खड्डय़ांमुळे भविष्यात शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला फक्त अंगदुखीची समस्या असते. कालांतराने याचा मणक्यांवर परिणाम होतो. वयोमानानुसार या समस्येतही वाढ होत राहते आणि या समस्येवर शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसतो,’ असे ते म्हणाले.

परीक्षा हुकली

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता १५ सप्टेंबरपासून राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. याच परीक्षेसाठी बुधवारी बदलापूर ते कल्याण परिसरातून अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह खासगी वाहनांनी ठाणे आणि मुंबईतील परीक्षा केंद्रावर जाण्याकरिता निघाले. मात्र कल्याणहून ठाण्याकडे जाण्याऱ्या भिवंडी मार्गावर या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीने गाठले. वाहतूक कोंडीत जवळपास अडीच ते तीन तास ही मुले अडकून पडली होती. त्यामुळे या सर्वाना ठाण्यातील त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. उशीर झाल्याने त्यांना परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणातील भवितव्याचाच प्रश्न उभा राहिला आहे.

महिलांची कुचंबणा

ठाणे जिल्ह्यातील मुख्य मार्गावर रस्त्याकडेला स्वच्छतागृहे नाहीत. याचा फटका महिलांना अधिक होत आहे. त्यामुळे दोन ते अडीच तासांहून अधिक तास वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना नैसर्गिक विधी पार पडणे शक्य होत नाही. याचा परिणाम शरीरावर होतो. मासिक पाळीच्या काळात खड्डय़ांतून प्रवास करणे अधिक यातनादायी असल्याचे अनेक महिला प्रवाशांनी सांगितले.