ठाणे – प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, विचारवंत, संगीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी ठाण्यात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा शनिवार, २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हार्बर सभागृह, टिप टॉप प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड-ठाणे चेकनाका जवळ, काशीश पार्क, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी, १५ मे रोजी पहाटे उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ठाण्यातील समतानगर परिसरात ते वास्तव्यास होते. परळ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन शहरांत शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शुक्रवार, २२ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नाशिक येथे कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका येथे शोकसभा होणार आहे. त्यानंतर ठाण्यात शनिवार, २३ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रविवार, २४ मे रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत पुण्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, जे. एम. मार्ग, शिवाजीनगर येथे श्रद्धांजली सभा पार पडणार आहे.
