ठाणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये खरेदी केलेल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील जमिनीवर त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी ठाण्यातील डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. प्रस्ताव सादर झाल्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्मारकासाठी जमीन उपलब्ध करावी, या मागणीसाठी विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. जांभूळ येथील संबंधित जमीन सध्या महिला व बालविकास विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे स्मारकासाठी ही जमीन उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाने प्रथम महिला व बालविकास विभागाकडे जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, असे निर्देश बनसोडे यांनी दिले. सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, महसूल विभाग आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयातून हा विषय पुढे न्यावा, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव प्र. बा. मिसाळ, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, कल्याणच्या उपविभागीय अधिकारी वृषाली पाटील, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, महसूल विभागाचे कक्ष अधिकारी डॉ. सुनील निमगावकर, जांभूळ येथील शासकीय पुरुष भिक्षेकरीगृहाचे प्रभारी अधीक्षक योगेश येंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे आणि सचिव कुसुम गौतम यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

जमीन परिसराला ऐतिहासिक महत्त्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे जमीन खरेदी केली होती. तत्कालीन निवडणूक प्रक्रियेत जमीनधारणा आवश्यक असल्याच्या तरतुदीमुळे त्यांनी ही जमीन घेतली होती. पुढे ही जमीन विकण्यात आली. मात्र, १९३६ ते १९४२ या कालावधीत बाबासाहेबांचे या परिसराशी नाते जोडले गेले होते. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत याठिकाणी स्मारक उभारावे, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. त्यासाठी जांभूळ येथील ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

बाबासाहेबांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांचे जतन आणि विकास करण्याच्या दृष्टीने जांभूळ येथील जमिनीवर स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या जागेचा प्रश्न प्रशासकीय समन्वयातून मार्गी लागल्यास बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्याबरोबरच त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होऊ शकते. मात्र, स्मारकासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अद्याप प्रस्तावाच्या टप्प्यावर असून, संबंधित विभागांच्या निर्णयानंतरच पुढील कार्यवाही स्पष्ट होणार आहे.

महसूल विभागाशी समन्वय साधणार

कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर झाल्यानंतर स्मारक उभारणी बाबत महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यात येईल. – अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष