डोंबिवली : एखाद्याला मारणं म्हणजे हिंसा अशी आपण हिंसेची व्याख्या करतो. ती खूप वरवरची आहे. कोणतीही सुविहित चौकट मोडणे म्हणजे हिंसा होय. सिग्नल तोडणे हीसुद्धा हिंसा आहे. त्या चौकटीच्या रक्षणासाठी शस्त्र हातात धरणे हा धर्म आहे. ती हिंसा नाही. भगवदगीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, की ज्याचे त्याला मिळावे ही धर्माची चौकट आहे. कौरवांनी ती तोडली आहे. ती परत प्रस्थापित करण्यासाठी युद्ध करणे पाप नव्हे. जीवन बदलून टाकण्याची ताकद आपल्या वैदिक हिंदू ग्रंथपरंपरेत आहे. असा हा विशाल हिंदू धर्म आणि हिंदू धर्म ग्रंथ परंपरा तरुण पिढीपर्यंत पोहचवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या डाॅ. धनश्री लेले यांनी शनिवारी येथे केले.

श्री लक्ष्मी नारायण सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि सल्लागार माधव जोशी यांच्या ‘वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा-स्वरूप सार आणि संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन बोडस सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यानंतर डाॅ. लेले यांनी ‘हिंदू धर्म म्हणजे नेमके काय’ या विषयावर व्याख्यान दिले.

यावेळी श्री गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, सुरेखा जोशी, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथालीचे विश्वस्त प्रभाकर भिडे उपस्थित होते. विश्वबंधुत्वाचे व सुसंस्कारांचे अधिष्ठान असलेला, नित्य विस्तारणारा, सर्व मतप्रवाह सामावून घेणारा विशाल हिंदू धर्म हा आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यात माधव जोशी यांचे पुस्तक आपणास मोठी मदत करील. कारण ते हिंदू ग्रंथपरंपरेचे स्वरूप व सार सोप्या व नेमक्या भाषेत मांडते आणि संविधानाशी सुंदर संवाद साधत आजच्या काळाशी सुसंगत अशी या ग्रंथ परंपरेची ओळख करून देते, असे लेले म्हणाल्या.

हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीच्या अर्धशतकी वाटचालीचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रंथालीचे ज्येष्ठ विश्वस्त प्रभाकर भिडे यांनी पुस्तकाचा आढावा घेताना ग्रंथाली नेहमीच वेगवेगळे विचार वाचकांसमोर ठेवत असते, हे प्रकाशित केलेल्या दीड हजार पुस्तकातून दिसून येते हे अधोरेखित केले.

कथक नृत्य गुरू आणि संशोधक ॲड. सुनीला पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. त्यांच्या शिष्यांनी दिंडीतून नृत्य करीत पुस्तके प्रकाशनासाठी मंचावर आणली. अबोली ठोसर यांनी ईशस्तवन सादर केले. सुरेखा जोशी यांनी आभार मानले. डोंबिवलीच्या बोडस सभागृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मंथन व्याख्यानमालेने केले होते.

मंथन व्याख्यानमालेतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, सवाई ८३, मधु मालती एंटरप्रायझेस, पै फ्रेंड्स लायब्ररी या सहभागी संस्थाचे कार्यकर्ते, तसेच प्रवीण दुधे, दीपक काळे, संदीप वैद्य आणि आदित्य बिवलकर यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग होता.