ठाणे – पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आधार देण्यासाठी नव्हे, तर ठाण्यात राजकारण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. तसेच या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांना विनाकारण ओढले जात असून महिला नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असताना, शिवसेना शिंदे गटाच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाण्यात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा खून झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना संबंधित नेत्यांनी आधार देणे अपेक्षित असते. मात्र, एखाद्या मृत्यूच्या घटनेतही स्वतःचे राजकारण शोधणे ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पूर्णेकर हत्या प्रकरणाशी मीनाक्षी शिंदे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना या प्रकरणात ओढले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. उद्धव ठाकरे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व असल्यामुळेच ते राजकारण करण्यासाठी येत आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आणि घटनेचा निष्पक्ष निषेध करण्यासाठी ठाकरे आले असते तर त्याचे स्वागत केले असते; मात्र या घटनेतही राजकीय संधी शोधली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना किती वेळा भेट दिली, असा सवाल वाघमारे यांनी केला. सोलापूरमधील चंद्रकांत भेतरे, मोहोळमधील पंडित देशमुख तसेच विजय सरवदे आणि सतीश शेटसागर या शिवसैनिकांच्या मृत्यूंचा संदर्भ देत, त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचे किंवा मदत करण्याचे सौजन्य ठाकरे गटाने दाखवले नसल्याचा दावा त्यांनी केला. दसरा मेळाव्यासाठी जाताना झालेल्या अपघातांतील शिवसैनिकांनाही मदत करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ

दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत, एफआयआरमध्ये नाव असल्याच्या आधारावर अटकेची मागणी केली जात असेल तर सर्वांसाठी समान निकष असायला हवेत, अशी भूमिका वाघमारे यांनी मांडली. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीची मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो म्हणजे गुन्ह्याचा पुरावा नाही

केवळ एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढल्याने संबंधित व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध होऊ शकत नाही, असे वाघमारे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना विविध ठिकाणी नागरिक फोटो काढण्याची विनंती करतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढले जातात. त्यामुळे फोटोच्या आधारे गुन्हेगारी संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. पूर्णेकर हत्या प्रकरणात कोणाकडे ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांना सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.