ठाणे : पुण्यातील डीजे बंदीविरोधातील मोर्चा असो किंवा दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी व्यासपीठावर महिलांच्या नृत्यावरून झालेले प्रकार असोत, समाजमाध्यमांवर या विषयी चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनीही खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी उत्सवांचा घसरत चाललेला स्तर आणि ध्वनिप्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. डाॅ. महेश बेडेकर यांनी पत्रात काय म्हटले पाहूया.
‘सुशिक्षित, सुरक्षित आणि उत्सवप्रेमी महाराष्ट्राला खुलेपत्र, पुण्यातील विद्यानंद बापट ह्यांनी ध्वनिप्रदूषण व सार्वजनिक उत्सवाच्या दरम्यान सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाला पुन्हा वाचा फोडल्याबद्दल मनःपूर्वक आभार. डॉ. यशवंत ओझे, श्रीमती उमेरा अब्दुलअली, डॉ. कल्याणी मांजरे, के. सरिता खांडेलवाल (उल्हासनगर) अशा अनेक सुजाण नागरिकांनी या विचारावर लेखी आपला आवाज उठवला आहे. सामाजिक माध्यमांमुळे हा विषय आता खूप चर्चिला जातोय. हा सगळ्या सुजाण नागरिकांचा व माझा आक्षेप कुठल्याही धर्माच्या उत्सवाला विरोध नसून उत्सवाच्या बदलत्या विकृत स्वरूपाला होत आहे. हा प्रश्न आता फक्त मोजक्या उत्सवांचाच उरला नसून वर्षभर चालणाऱ्या वेगवेगळ्या सार्वजनिक जयंती, मिरवणुका व इतर अनेक समारंभांच्या वेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाशी संबंधित आहे.
भारतातील सरासरी आयुर्मान ही एकूण आयुर्मान आणि चांगल्या आरोग्यात जगल्या जाणाऱ्या वर्षांमध्ये मोठी तफावत असल्याचे दर्शवते. भारतातील जनतेचे एकूण आयुर्मान साधारणपणे ७२ ते ७३ वर्षे असताना, आरोग्य-समायोजित आयुर्मान केवळ सुमारे ५८ ते ६० वर्षे आहे. यावरून असे दिसून येते की सरासरी भारतीय व्यक्ती आपल्या आयुष्याची शेवटची सुमारे दहा वर्षे दीर्घकालीन आजार किंवा अपंगत्वाशी झुंज देत घालवते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा अहवाल हा डोळ्यात अंजन घालणारा आहे.
या अहवालातील काही प्रमुख मुद्दे :
१) अतिशय मोठ्या आवाजाच्या संपर्कामुळे श्रवणशक्तीला कायमस्वरूपी किंवा तात्पुरते नुकसान, कानात सतत घंटानाद किंवा गुंजारव (टिनिटस), कान दुखणे अथवा भरल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात.
२) झोपेवर परिणाम : दिवसा थकवा, एकाग्रता कमी होणे, चिडचिड, ताण, चिंता आणि मानसिक थकवा यांसारखे परिणाम दिसू शकतात.
३) ध्वनिप्रदूषणामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढ होऊ शकते.
४) ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या झोपेतील व्यत्यय, शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यासह विविध आरोग्याविषयी परिणामांशी संबंध आढळतो. त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे टाकात्सुबो कार्डिओमायोपॅथी, ज्याला ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ असेही म्हटले जाते, यासारख्या स्थिती उद्भवू शकतात. ही दीर्घकाळाशी संबंधित हृदय निकामी होण्याची एक तीव्र स्वरूपाची अवस्था आहे. दीर्घकालीन तणावामुळे हायपोथॅलेमिक-अॅड्रेनल-पिट्युटरी सक्रिय होणे ही त्यामागील एक महत्त्वाची शारीरिक प्रक्रिया आहे.
५) लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिला यासारख्या संवेदनशील व्यक्तींना ध्वनी प्रदूषणाचा जास्त त्रास होत असतो. गर्भवती महिलेच्या गर्भात असलेल्या गर्भालाही त्याचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांमध्ये रक्तदाब वाढल्यामुळे प्रीटर्म डिलिव्हरीची शक्यता वाढते. गर्भवती महिलांमध्ये अबॉर्शन, प्रीटर्म डिलिव्हरी यासारखे दुष्परिणाम वाढू शकतात.
शनिवार झालेल्या उत्सवात जय्यतकरी असेल हावभाव करणारी नृत्य सादर करण्यात आली, ही कुठल्याही सभ्य समाजाला पटणारी नाही. सार्वजनिक ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिक असे सादरीकरण बघत असतात; या सगळ्याचा समाज मनावर नकळत विपरीत परिणाम होतो. श्री राज ठाकरे यांनी याबाबत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. केवळ अशा प्रकारच्या सार्वजनिक अश्लील नृत्य व हावभावावर सुजाण नागरिकांकडून विरोध झाला नाही तर संस्कृतीच्या नावाखाली अशा कार्यक्रमांचा पायंडा पडतो.
डाॅ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य, पीआयएल १७३-२०१० या जनहित याचिकेसंदर्भात सरन्यायाधीश ओक यांनी दिलेला निर्णय हा महत्त्वाचा आहे. समाजातील बहुतांश आपल्या सणांच्या साजरीकरणाचे बदललेले स्वरुप व धिंगाणा हे पटत नाही, पण हाच समाज दहशती आणि भितीपोटी शांत राहणे पसंत करतो. सरन्यायाधीश ओक यांनी दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी करायची जबाबदारी जशी प्रशासनावर आहे, तेवढीच किंबहुना त्याहून अधिक समाजावर आहे. सामाजिक बदल हा कुर्मगतीने समाजाच्या सहभागानेच होत असतो. चला, तर एक सुजाण महाराष्ट्रीय समाज म्हणून आपले शेकडो वर्ष जुने, आनंद देणारे, समाजाला एकत्र ठेवणारे सण व उत्सवव सुसंस्कृत पद्धतीने साजरे करण्यासाठी आपण एकत्र येऊयात… असे या पत्रात बेडेकर यांनी लिहीले आहे.
