‘‘आपल्याकडे काय कमी आहे याचा विचार न करता पुढे चालत राहिलो, तर जीवनात नक्की यश प्राप्त होईल,’’ असे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित केलेल्या नागरी पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले.
डॉ. प्रकाश बाबा आमटे सत्कार समिती, कल्याण यांच्या वतीने शुक्रवारी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा नागरी सत्कार सोहळा व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्यावर आधारित चित्रफीत दाखवून करण्यात आली. यानंतर सत्कार समितीतर्फे आमटे दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यानंतर समिती व कल्याणातील नागरिकांच्या साहाय्याने तब्बल सहा लाखांची आर्थिक मदत आमटे दाम्पत्याकडे सुपूर्द करण्यात आली. याबरोबरच आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत सुप्रसिद्ध मुलाखतकार मंगला खाडिलकर यांनी घेतली. आपल्याकडे काय कमी आहे याचा विचार न करता यशप्राप्तीसाठी पुढे चालत राहणे आवश्यक आहे, तसेच समर्पणाची वृत्ती सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक असते; त्यामुळेच लोकबिरादरीसारखा प्रकल्प उभा राहू शकला, असे  डॉ. आमटे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. डॉ. प्रकाश आमटे यांचे बालपण, त्यांचे वैवाहिक जीवन, त्यांचे प्राणीविषयक प्रेम, आदिवासी बांधवांसाठी चालणारे त्यांचे कार्य असे अनेक विषय मुलाखतीदरम्यान खाडिलकर यांनी अधोरेखित केले. सुरुवातीच्या काळातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण अशा सर्व अडचणींचा सामना बाबांच्या संस्कारांमुळे आणि निश्चित ध्येयशक्तीमुळे आपण करू शकलो, असे डॉ. आमटे या वेळी म्हणाले. प्राण्यांना प्रेमाची भाषा कळते आणि ते स्वत:हून दुसऱ्यावर कधीही हल्ला करत नाहीत किंवा दगा देत नाहीत, असेही डॉ. आमटे यांनी या वेळी सांगितले.