अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमधील (एम्स) मास्टर ईन डेन्टल सर्जरी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘आयएनआय सीईटी’ परीक्षेत कल्याण शहरातील डॉ. पृथ्वी परळीकर या विद्यार्थ्याने देशात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.

याच प्रवेश परीक्षेसाठी ‘नीट एमडीएससाठी’ घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतही डॉ. पृथ्वी देशभरातून १६ आला आहे. या दोन्ही प्रवेश परीक्षांममध्ये घवघवीत यश संपादन केल्याने कल्याण मधील रहिवाशांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

नीट एमडीएस प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या पहिल्या गटातील २५ विद्यार्थ्यांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुखजी मांडविय यांनी कौतुक सोहळ्या निमित्त गुरुवारी आपल्या नवी दिल्लीतील निवास स्थानी कौतुक सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

डॉ. पृथ्वी हा कल्याण मधील श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी इंग्लिश शाळेचा विद्यार्थी आहे. बी. के. बिर्ला महाविद्यालयात त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बेळगाव येथून त्याने आपले दंत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तो या शिक्षण अभ्यासक्रमातील सुवर्ण पदकाचा मानकरी आहे. तो दंत वैद्यकीय शिक्षणातील पदव्युत्तर शिक्षणासाठी आता सज्ज झाला आहे.