कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना-भाजप युतीचे कितीही गोडवे गायले जात असले तरी कोणत्याही परिस्थितीत भाजपला डिवचण्यासाठी आणि खच्चीकरणााठी शिवसेना शिंदे गटाकडून एकही संधी सोडली जात नाही. कल्याण डोंबिवली पालिका मतमोजणीनंतर युतीमधील भाजपशी बोलणी करण्याऐवजी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या शिलेदारांंनी थेट आपला परंपरागत शत्रू मनसेचे नेते राजू पाटील यांच्याशी तह घडवून कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्तेत मनसेचा पाठिंबा मिळवून घेतला.

या सर्व घडामोडीमुळे मनसेने राजू पाटील यांना मनसेने पदाधिकाऱ्यांंनी ‘रिअल धुरंधर’ उपाधी दिली. तर पालिकेतील सत्तेत शिवसेनेचाच (एकनाथ शिंदे) महापौर बसविण्यात खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी महत्चाची भूमिका बजावली. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या राजकारणातील ‘बाजीगर’ अशा उपाधीचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे फलक कल्याण, डोंबिवली शहर परिसरात झळकत आहेत.

गेल्या वर्षापासून पालिकेत भाजपचा महापौर बसेल, असे भाजपकडून सांंगितले जात होते. कल्याण डोंबिवली शहरे भाजपमय करण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना आयत्यावेळी पाचरमारांनी खीळ घातली. शिवसेना शिंदे गट परस्पर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष खिंडीत गाठून संपवत असेल तर भाजपने सध्या नरमाईची भूमिका घ्यावी, असा संदेश भाजपच्या दिल्लीश्वरांनी भाजप नेत्यांना दिला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शांत राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.

या खेळीमुळे बळ मिळालेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कोणत्याही टीकेला न जुमानता मनसेच्या राजू पाटील यांच्या समर्थक पाच नगरसेवकांचा कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्तेत बिनाशर्त पाठिंबा मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्याच बरोबर पालिका मतमोजणीनंतर ठाकरे गटाचे चार नगरसेवक फोडण्यात महत्वाची भूमिका बजावून त्यांना आपल्या बाजुला वळविण्यात यश मिळविले आहे.

याशिवाय ठाकरे गटाचे उर्वरित सात नगरसेवक बिबट्याच्या चालीने फोडण्यासाठी खासदार शिंदे यांचे शिलेदार प्रयत्नशील होते. पण त्यांचे डाव यशस्वी झाले नाहीत. कर्जत परिसरातील फाॅरेस्ट क्लबवरून वेळीच बाजुला झाल्याने फोडाफोडीकारांच्या तावडीतून ठाकरे गटाचे सात नगरसेवक बचावले. भाजपने कोणत्याही कुरबुरी करायला नको म्हणून मोठ्या चतुराईने खासदार डाॅ. शिंदे यांनी मनसेचा आणि ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून पालिकेतील आपल्या संंख्याबळाचा आकडा बहुमतापर्यंत नेण्यास यश मिळविले आहे.

या सगळ्या चतुराईच्या खेळींमुळे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या राजकारणात भाजपला वेशीवर आणि थंड बसत्त्यात ठेऊन महत्वाची भूमिका बजावल्याने त्यांच्या समर्थकांनी खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांना बाजीगर उपाधी देऊन, त्या आशयाचे फलक शहरभर झळकवले आहेत. पालिकेतील सत्तेला पाठिंबा देऊन मनसे पदाधिकाऱ्यांच्या नजरेत राजू पाटील रिअल धुरंधर ठरले तर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे बाजीगर ठरल्याची भावना शिंदे समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.