नालेसफाईचा यंदाही बोऱ्या!

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देऊनही ही ‘डेडलाइन’ पाळणे महापालिकेच्या ठेकेदारांना जमलेले नाही.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देऊनही ही ‘डेडलाइन’ पाळणे महापालिकेच्या ठेकेदारांना जमलेले नाही. शहरातील ७३ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी कळवा, मुंब्रा, वागळे परिसरातील अनेक नाल्यांमध्ये अजूनही कचऱ्याचे ढीग दिसत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या अहवालानुसार कळवा आणि मुंब्रा परिसरात तर सरासरी ६५ टक्के इतकीच नालेसफाई झाल्याने या विभागात यंदाही पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका कायम आहे. मूळ शहरातील काही भागांमध्येही नाल्यांची योग्य तऱ्हेने सफाई झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांकडे वर्षभर ढुंकूनही पाहत नसलेल्या महापालिका प्रशासनाला पावसाळा तोंडावर येताच साफसफाईची आठवण येते. मात्र, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे कधीच पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात नाले तुंबून रस्त्यांवर तसेच घरांत पाणी साचण्याचे प्रकार हमखास घडतात. याबाबत दर वर्षी होणारी ओरड लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने नालेसफाईची मोहीम लवकर सुरू केली. शहरातील नाल्यांतील कचरा व गाळ काढण्यासाठी ठेकेदारांना ३१ मेची मुदत देण्यात आली होती. आठवडय़ाभरापूर्वी पालिकेने केलेल्या पाहणीत ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचे दिसून आले होते. उर्वरित नालेसफाई ठरलेल्या मुदतीपूर्वी होईल, असा पालिकेचा दावा होता. मात्र, मुदत संपल्यानंतरही आतापर्यंत ७३ टक्के नाल्यांचीच सफाई पूर्ण झाल्याचे महापालिकेची आकडेवारी सांगते. शहरातील एकूण ९६६२५ मीटर लांबीच्या नाल्यातून ९०२७ घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे तर २६९१.३ घनमीटर गाळ अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
8

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Drainage cleaning work in thane still pending

ताज्या बातम्या