कल्याण– कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नाले सफाईची कामे योग्यरितीने केली नाहीतर संबंधित ठेकेदारांना देयके देणार नाही, असा इशारा पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदारांना दिला आहे. शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी पाहणी केली. या दौऱ्याच्यावेळी अनेक नाले आणि गटारे सिमेंटच्या राडारोड्यानी भरले असल्याचे चित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाले सफाईची कामे ठेकेदारांनी व्यवस्थितरीत्या करावी. या कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाची देयके काढली जाणार नाहीत, असा इशारा आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदारांना दिला. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ९५ किमी लांबीचे ९७ नाले आहेत. नाल्यांमध्ये आठ महिन्याच्या काळात कचरा, राडारोडा वाहून आलेला असतो. नाल्यांचे प्रवाह अनेक ठिकाणी बंद झालेले असतात. हे प्रवाह मोकळे करण्याचे काम नाले सफाईच्या माध्यमातून होते.

हेही वाचा >>> डोंबिवलीसह ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांची कामे जून अखेर पूर्ण

आयुक्त डाॅ. दांगडे यांनी कल्याण मधील महालक्ष्मी हाॅटेल नाला, सांगळेवाडी, सर्वेादय माॅल, जरीमरी नाला, डोंबिवली जवळील निळजे खाडी नाला, एमआयडीसीतील कावेरी नाला, रामचंद्रनगर नाला, देसलेपाडा म्हसोबा चौक नाला भागाची पाहणी केली. पालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त स्वाती देशपांडे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, साहाय्यक आयुक्त भारत पवार, तुषार सोनावणे उपस्थित होते.

डोंबिवली पश्चिम गाळात

डोंबिवली पश्चिमेतील अंतर्गत गटारे, नाले कचरा, गाळांनी भरली आहेत. अनेक ठिकाणी सांडपाण्याचे प्रवाह अडले आहेत. वर्षानुवर्ष कामे करणारा ठेकेदार ही कामे करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मुख्य रस्त्यावरील काही गटारे साफ करायची, ओरडा करणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागातील गटारांची सफाई करायची. पाऊस सुरू झाला की उर्वरित कामे पूर्ण न करता ते पूर्ण झाल्याचे दाखवून देयक काढून घेण्याची पध्दत डोंबिवली पश्चिमेत काम करणाऱ्या ठेकेदाराची  असल्याचे पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. आयुक्तांनी एक दिवस अचानक डोंबिवली पश्चिमेतील भरत भोईर नाला, उमेशनगर, देवीचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा, जुनी डोंबिवली भागातील गटार, भरत भोईर नाला, कोपर नाल्यांची पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>> ठाणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बेदम मारहाण

शहर जलमय होण्याची भीती

पालिका हद्दीत नाले, गटार सफाईची कामे खूप संथगतीने सुरू आहेत.  नाले आणि गटारे जागोजागी गाळ, कचऱ्यांनी भरलेले असून ही कामे पालिका कधी पूर्ण करणार, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी १० जून पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जात होती. यावेळी शहरातील महत्वाचे नाले, अंतर्गत गटारे गाळ, कचऱ्यांनी भरले आहेत. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर मुसळधार पावसाच्या वेळेत शहर जलमय होण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

“नालेसफाईची कामे जोमाने सुरू आहेत. या कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांची देयके अदा न करण्याचा निर्णय घेतला आहे.”

-डाॅ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drainage works done properly kalyan dombivli municipal commissioner warning to contractors ysh
First published on: 29-05-2023 at 11:52 IST